प्रवास म्हणजे कुटुंबाने दिलेली खंबीर साथ.
प्रवास 17 अवलियांचा,
प्रवास दोन चाकांचा, दोन पायांचा, एका मेंदूचा.
प्रवास तीन राज्यातला, राष्ट्रीय महामार्ग 44 /48 / 50 / 52 व एक एशियन हायवे 47 वरून जाणारा.
भीमा, मलप्रभा, गटप्रभा, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा या नद्यांना पार करून पुढे जाण्याचा.
प्रवास 21 जिल्ह्यांचा. प्रवास सहा रोटरी डिस्ट्रिक्टमधून जाणारा…
आमचा सायकल प्रवास 4 ऑगस्टला सुरू झाला असला तरी त्याची सुरुवात भर पावसात सरावाने झाली. मित्राने सांगितले पावसाळ्यात हे डोक्यात खुळ काय काढलय ! दक्षिणेमध्ये प्रचंड पाऊस असतो मग काय आम्ही लागलो तयारीला !!
जास्तीचे कपडे,बूट,हॅन्ड ग्लोज अशी प्रचंड खरेदी केली प्रत्यक्षात मात्र पूर्ण प्रवासामध्ये एक थेंबही पाऊस लागलाच नाही मात्र उन्हामुळे पाणी विकत घेऊन अंगावरती मारावे लागले. या प्रवासाचे वर्णन करायचं तरी कसं कारण स्वतःच्या लग्नात सुद्धा एवढी तयारी केली नाही जेवढी आम्ही सामानाची आवरावर केली आणि याच्यात आणखी भर म्हणून की काय नवीन जोडपं ज्या पद्धतीने प्री-वेडिंग फोटोशूट करतो त्या पद्धतीने आम्ही Pre-Expedition फोटोशूट सुद्धा उरकून घेतले होते. मध्यंतरी आम्ही रायगड सर केल्यानंतर खऱ्या अर्थाने दक्षिण दिग्विजय मोहिमेची मूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली गेली आणि आम्ही कन्याकुमारीच्या प्रवासाला सुरुवात केली.
कन्याकुमारीला जात असताना अंतराची चिंता कुठेही नव्हती परंतु संपूर्ण प्रवास राष्ट्रीय महामार्गाचा आणि रहदारीचा असल्यामुळे मनामध्ये थोडे दडपण होते. 4 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व रोटरी सदस्य व मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी पहाटेच्या वेळी आल्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला होता. आमचे मित्र श्री गणेश एकंडे यांनी दिलेली गारद आम्हाला सतत आठ दिवस ऊर्जा देत राहिली तेही त्यांच्या पहाडी आवाजामध्ये – प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय……
प्रवासाला निघत असताना आमच्या सतरा जणांच्या डोक्यावरती हेल्मेट, सायकलला पुढे पाठीमागे टॉर्च आणि पाण्याची बाटली हे सर्व होतेच. आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या समोर थांबून आम्ही त्या ठिकाणी एकत्र गंभीरपणे एका विषयावरती चर्चा केली की आपण कुठल्याही शर्यतीला निघालेलो नाहीयेत आपण एका मोहिमेवरती चाललेले आहोत की ती मोहीम पूर्ण करून आपल्याला सुखरूप घरी परतायचे आहे.
आमचा सायकल प्रवास सुरू झाला आणि माझीच पहिली सायकल बिघडली आणि ती परत भल्या पहाटे मला दुरुस्तीसाठी परत आणावी लागली आणि मग नंतरचा पुढचा प्रवास सुरू झाला. प्रवासामध्ये असे छोटे मोठे सायकल पंक्चर होणे, टायर खराब होणे, चैन तुटणे असे अडथळे येत गेले परंतु त्या सर्वांना आम्ही एकजूट होऊन आनंदाने सामोर गेलो. आम्ही आमचे कपडे सुद्धा दररोज धुऊन वाळवून परत वापरायचो. प्रवासामध्ये एक गोष्ट आयुष्यभर लक्षात अभिमानाने राहील की राष्ट्रीय महामार्ग 44 घाटामध्ये आम्हा अवलियांसाठी (सुरक्षेची काळजीसाठी महामार्गाची डावी बाजू) वाहतुकीला तीन मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता. खरंच तामिळनाडू राज्यातल्या त्या हायवे अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
या प्रवासामध्ये बंगळुरू शहर ओलांडून पुढे जात असताना रहदारीच्या ठिकाणी चक्क तो हायवे थांबून आम्हाला परत जाण्यास सांगितलं आणि रस्ता बदलून आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो. जंगलामध्ये निर्मनुष्य ठिकाण बघून आणि रस्त्याच्या कडेचे सिंह अस्वल यांचे फोटो बघून आमच्या मनातली धाकधूक वाढलेली, असे काही प्रसंग आज आठवतात. या संपूर्ण प्रवासामध्ये रोटरी क्लबची खूप मोठी मदत आम्हाला राहण्यासाठी, जेवणासाठी झाली आणि रोटरी परिवार किती मोठा आहे – माणुसकीचा आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही या ठिकाणी घेतला. या प्रवासामध्ये रोटरी क्लबचे रिफ्लेक्टर जॅकेट अगदी पोलिसांच्या युनिफॉर्म प्रमाणे वाटायचे. या प्रवासामध्ये आमच्या टेम्पो ड्रायव्हर, गाडीचा ड्रायव्हर, आम्हाला आठ दिवस वेळोवेळी पोटाची भूक भागवणारा सुरेंद्र या सगळ्यांचे महत्त्व ते आम्हाला सोडून परत आल्यानंतर जाणवलं की ज्या ठिकाणी आम्ही तीन दिवस परत मुक्कामाला होतो. अण्णा इडली वडा सांबर फक्त कुस्करूनच खायचं एवढेच काय चालू होतं.
शालेय जीवनामध्ये पु ल देशपांडे यांचे पूर्वरंग वाचण्यामध्य आले होते. प्रवासामध्ये एक गोष्ट जाणवली की प्रांत ओलांडल्यानंतर भाषा जरी आडवी येत असली तरी त्यांच्या भावना कळल्या तरी संवाद सोपा होतो. कर्नाटक राज्यातले शेवटी हल्ली नावाची गाव काय आणि तामिळनाडूतली पल्ली काय, लांबच लांब अक्षर असलेली गावांची नावे काय आणि माझं लक्ष केंद्रित झालं ते छत्रपती नावाचा एक खेडेगाव !!
सायकल प्रवास केल्यानंतर दोन दिवस आम्ही पद्मनाभन स्वामी मंदिर, कन्याकुमारी देवी मंदिर, रामेश्वरम या ठिकाणी असलेलं मंदिर अशा ऐतिहासिक ठिकाणी सुद्धा आम्ही भेटी दिल्या आणि मनामध्ये कुठेतरी इतिहास जागा झाला या दख्खनच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि नंतर सुद्धा आपल्या छातीचा कोट केल्यामुळेच या दक्षिणेतल्या वास्तू आज जशास तशा उभ्या आहेत याचा खूप मोठा अभिमान आम्हाला या ठिकाणी वाटला. स्वामी विवेकानंद स्मारक, कवी तिरुवल्लूवर यांचा पुतळा व चक्रीवादळामध्ये उध्वस्त झालेले धनुषकोडी कायमस्वरूपी स्मरणात राहतील.
सायकल प्रवास पूर्ण केल्यानंतर आज एक सुखद आनंद या गोष्टीचा आहे की सध्याच्या या व्यवहारीक जगामध्ये माणसाकडे घर, गाडी, पैसा या चष्म्यातून पाहिले जाते परंतु वाटेत असेल किंवा आज घरी परत आल्यानंतर आपल्या गावातल्या लोकांकडून असेल खरंच आपल्या कौतुकाची थाप ही वेगळ्या पद्धतीने नोंद घेणारी नक्कीच आहे आणि आपल्याला कुठेतरी आपली दृष्टी बदलायला लावणारी नक्कीच आहे. सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर हलगी वाजवत मित्रांनी केलेले स्वागत, आमचे मित्र थोरात यांच्या भगिनी यांनी सहकुटुंब आमचे केलेले स्वागत आम्हाला कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे.
रोटरी क्लब उस्मानाबादने आमच्या या पूर्ण प्रवासासाठी आर्थिक सहकार्य देखील केलेलं होतं. या मोहिमेचा महत्त्वाचा घटक असलेले फ्युचर सायकल अँड स्पोर्ट्सचे मनापासून आभार कारण सर्व सतरा सायकलची दुरुस्ती याच ठिकाणी आम्ही करून घेतली होती.
जाता जाता एवढेच सांगता येईल की आयुष्यभर आम्ही 17 जण या फोटोमध्ये स्वतःला शोधत राहू , गोड आठवणींना उजाळा देत राहू….
सायकल प्रवास केवळ दोन चाकांपुरता मर्यादित नव्हता कारण आम्ही सतरा जण धाराशिव ते कन्याकुमारी केवळ सायकल चालवत गेलो नव्हतो तर आमच्या आयुष्याच्या इतिहासाचे एक पान लिहून आलो होतो – एवढेच या ठिकाणी सांगेन.
क्रमशः