तुळजापूर ड्रग्स प्रकरणात पालकमंत्री प्रताप सरनाईक आक्रमक
ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची संख्या तीनवरून पाचवर
आरंभ मराठी / तुळजापूर
श्री क्षेत्र तुळजापूर येथे उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (दि.२०) आक्रमक भूमिका घेतली व पोलिसांना 72 तासांचा अल्टिमेटम दिला. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला सोडू नका, माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत, पुढच्या 72 तासात मला या प्रकरणाचा अहवाल सादर करा असा आदेश त्यांनी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना दिला. दरम्यान यातील आरोपींची संख्या तीन वरून पाच झाली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर प्रशासकीय कार्यालयातील बैठकीत शहरातील पुजारी बांधवांनी शहरात गेल्या अडीच वर्षापासून ड्रग्सची विक्री खुलेआम सुरू असून जवळपास दीड ते दोन हजार तरुण याच्या अधीन गेल्याचे सांगितले.
याबाबत वेळोवेळी उपविभागीय पोलीस अधीकारी निलेश देशमुख व पोलीस निरीक्षक खांडेकर यांना गुन्हेगारांची नावानिशी यादी दिलेली आहे. तसेच ड्रग्स घेत असलेले व्हिडिओ देऊनही पोलिसांनी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला. पुजाऱ्यांच्या आरोपावर पालकमंत्री सरनाईक यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.
या प्रकरणात पुढील 72 तासात मला अहवाल सादर करा आणि गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला ताब्यात घ्या असा आदेश दिला. काही पुजाऱ्यांना पोलिसांनी धमकावल्या प्रकरणी सरनाईक यांनी पोलिसांना धारेवर धरले. तक्रारदारांना धमकावल्यास पोलीस अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे केली जाईल असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकरणावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत त्यामुळे पोलिसांनी जबाबदारीने काम करावे असे आदेश त्यांनी दिले.
मला खोट्या केस मध्ये अडकवण्याची भीती आहे
पूर्वी झालेल्या मंदिर संस्थानच्या बैठकीत आम्ही शहरातील ड्रग्स रॅकेट विषयी पोलिसांना कल्पना दिली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पालकमंत्र्याकडे तक्रार केल्यानंतर तुम्ही खोटी माहिती देत आहात, मी तुमच्यावर कारवाई करीन अशी धमकी मला निलेश देशमुख यांनी दिली. यापुढे मला पोलिसांकडून खोट्या केस मध्ये अडकवण्याची शक्यता असून ड्रग माफिया कडूनही आमच्यावर हल्ले करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विपिन शिंदे अध्यक्ष पुजारी मंडळ तुळजापूर
आरोपींची संख्या पाचवर
ड्रग्स प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ झाली असून तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग व मुंबई येथील संगीता गोळे यांना यात आरोपी करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्या 3 आरोपींची 5 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना काल धाराशिव येथील कोर्टात हजर करण्यात आले, त्यावेळी पोलिसांनी कोर्टात तपासाचा अहवाल व रिमांड दाखल केले. पोलिसांनी 9 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती ती मान्य करून आरोपींना 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सध्या फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांना आरंभ मराठीने विचारलेले प्रश्न
प्रश्न – आपण विपीन शिंदे यांना धमकावले आहे असा आपल्यावर आरोप केला जातोय?
उत्तर – मी कोणालाही धमकावले नाही. विपीन शिंदे यांना मी फक्त तुमच्याकडे पुरावे असतील तर ते पोलिसांना सादर करा असे सांगितले, याला त्यांनी धमकी समजले आहे. हा व्यक्ती कायम खोटे आरोप करत आला आहे. नवरात्राच्या काळात देखील पोलिसांनी पैसे घेऊन पास वाटल्याचा आरोप केला होता जो पुढे खोटा ठरला. त्यामुळे या व्यक्तीच्या आरोपांना किती गांभीर्याने घ्यायचे हे तुम्ही ठरवा.
प्रश्न – तुळजापूरमध्ये ड्रग्जचे रॅकेट सक्रिय आहे का?
उत्तर – आता समोर ज्या घटना आल्या आहेत त्यावर आम्ही पूर्वीपासून काम करत आहोत. यापूर्वी दोन वेळा या प्रकरणात आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सबळ पुरावे हाती लागले नव्हते. माझी स्थानिक नागरिकांना विनंती आहे की, तुमच्याकडे याबाबतीत काही पुरावे असतील तर समोर येऊन ते पोलिसांना द्या आम्ही त्यावर काम करू.
प्रश्न – ड्रग्ज प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे?
उत्तर – आम्ही याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या पाच आरोपी निष्पन्न झाले आहेत. आणखी आरोपी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागले आहेत.
प्रश्न – तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ड्रग्ज सापडते हे पोलिसांचे अपयश नाही का?
उत्तर – कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. ड्रग्ज सारख्या गोष्टी सापडणे गंभीर आहे. परंतु या प्रकरणाचा छडा लावला जाईल. आरोपी कोणीही असला तरी त्याच्यावर कार्यवाही केली जाईल.