जिल्ह्यातील तीन हजार महिला योजनेतून झाल्या बाद
आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिलांच्या खात्यात योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील आठवा हप्ता दिनांक 22 फेब्रुवारी पासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे आहे. 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या सहा दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यावर आठव्या हप्त्याचे प्रत्येकी दीड हजार रुपये जमा होणार आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील चार लाखापेक्षा अधिक महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे.
तथापि जानेवारी महिन्यातील लाभ घेतलेल्या जवळपास तीन हजार महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यातून वगळण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.ज्या महिला संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान शेतकरी सन्मान योजना, नमो शेतकरी सन्मान योजना या योजनांचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या अशा जवळपास तीन हजार महिला फेब्रुवारी महिन्यात या योजनेतून बाद करण्यात आल्या आहेत.
तर जिल्ह्यातील दहा महिलांनी स्वतः होऊन योजनेचा लाभ सोडला आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरु केली.
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु होऊन 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालली. या कालावधीत सरकारकडे धाराशिव जिल्ह्यातून ऑफलाइन आणि ऑनलाइन चार लाखांहून अधिक महिलांनी अर्ज दाखल केले होते.
सरकारकडून आता या अर्जांची छाननी सुरू असून, सध्या इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला यातून वगळण्यात येत आहेत. पुढील काळात चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांची नावे कमी करण्यात येणार आहेत. त्यामुळे दर महिन्याला दोन ते तीन हजार महिलांची नावे या योजनेतून कमी होऊ शकतात.
सध्या ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावर 22 फेब्रुवारी पासून आठवा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ज्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही त्यांचे नाव योजनेतून बाद करण्यात आले असण्याची शक्यता आहे.