विमा कंपनीचे अपील राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने फेटाळले
शेतकऱ्यांना हेक्टरी 12 ते 14 हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा
आरंभ मराठी / धाराशिव
खरीप 2022 च्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय झाला आहे. त्यामुळे पीकविमा भरलेल्या जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
खरीप 2022 च्या पीक विमा संदर्भात सोमवारी (दि.१७) मंत्रालय, मुंबई येथे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक बोलवण्यात आली होती. भारतीय कृषी विमा कंपनीने विभागीय आयुक्तांच्या विरोधात राज्यस्तरीय तक्रार समितीकडे तक्रार दाखल केली होती, त्या अनुषंगाने ही बैठक बोलवण्यात आली होती.
यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे उपलब्ध करून द्यावेत, पंचनामातील नुकसान भरपाई प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, बाद केलेल्या पूर्वसूचनांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश या बैठकीत देण्यात आले. त्यामुळे विमा कंपनीला चांगलीच चपराक बसली आहे.
या निर्णयामुळे पीक विमा कंपनीला 500 ते 600 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची सोमवारची बैठक धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक ठरली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधान सचिव कृषी विकास रस्तोगी, अवर सचिव सरिता पाटील, आमदार प्रवीण स्वामी, शेतकरी प्रतिनिधी अनिल जगताप, तक्रारदार पद्मराज गडदे, तक्रारदार माने, भारतीय कृषी विमा कंपनीचे अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे सोनटक्के, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृषी आयुक्त तसेच सांख्यिकी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विमा कंपनीने वारंवार मागणी करूनही पंचनाम्याच्या प्रति शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या नाहीत याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.
पंचनाम्याच्या प्रति उपलब्ध करून दिल्यास हेक्टरी 12 ते 14 हजार रुपये मिळणार
पीक विमा कंपनीने पंचनाम्याच्या प्रति उपलब्ध करून दिल्यास कंपनीला जवळपास 500 ते 600 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करावे लागतील. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 12 ते 14 हजार रुपये द्यावे लागतील. यापूर्वी विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिलेली रक्कम 352 कोटी रुपये असून, त्याचे वितरण असमान केलेले आहे. त्यावेळी कोणाला हेक्टरी 5000 रुपये मिळाले होते तर कोणाला हेक्टरी 18000 रुपये कंपनीने दिले होते. पंचनाम्याच्या प्रति उपलब्ध करून दिल्यास त्यानुसार शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा
धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्त्वाची व यशस्वी ठरली. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष विकास रस्तोगी, प्रधान सचिव कृषी यांनी पिक विमा कंपनीचे अपील फेटाळून लावत पंचनामाच्या प्रति व त्यानुसार नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा खूप मोठा आर्थिक दिलासा आहे.
अनिल जगताप
सामाजिक कार्यकर्ते तथा पिक विमा याचिकाकर्ते.
खरीप 2022 मध्ये पीकविमा भरणारे एकूण शेतकरी – 6 लाख 68 हजार 436
एकूण विमा संरक्षित क्षेत्र – 5 लाख 2 हजार 32 हेक्टर
आतापर्यंत मिळालेली नुकसान भरपाई – 352 कोटी
नुकसान भरपाई मिळालेले शेतकरी – 5 लाख 19 हजार 462