नवे संकट, दोन वर्षात संख्या 30 वर जाणार,
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव –
धाराशिव जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांपासून वाघाने थैमान घातले असताना दुसरीकडे बिबट्याची दहशत देखील वाढली आहे. मागील तीन वर्षांपासून बिबट्या हा प्राणी धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात दृष्टीस पडत असून, सध्या धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात १० ते १२ बिबट्यांचा अधिवास असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातील चार बिबटे सध्या वाघाचे अस्तित्व असलेल्या रामलिंग अभयारण्यात आहेत. बिबट्याने अजून मानवावर हल्ला केला नसला तरी भविष्यात बिबट्या आणि मानव हा संघर्ष उभा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाच बिबट्याशी जुळवून घ्यावे लागेल असे वनविभागाचे म्हणणे आहे.
मुबलक ऊस, रानडुकरांचा मोठ्या प्रमाणावर असणारा आढळ आणि अधिवासाला अनुकूल वातावरण, यामुळे धाराशिव जिल्ह्यातील काही भागात मागील तीन वर्षांपासून बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वाघ आढळल्यामुळे तो कौतुकाचा विषय झाला आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून वाघाला पकडण्याचे प्रयत्न रेस्क्यू टीमकडून केले जात आहेत. तर दुसरीकडे बिबट्यांची देखील दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या वाघ ज्या रामलिंग अभयारण्यात आहे त्याच अभयारण्यात चार बिबट्यांचे देखील वास्तव्य असल्याचे वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले आहे. म्हणजे २१०० हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या रामलिंग अभयारण्यात सध्या एक वाघ आणि चार बिबटे असे पाच हिंस्र प्राणी वास्तव्यास आहेत.
बिबट्या हा भित्रा असल्यामुळे वाघ आणि बिबट्या यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता कमी असली तरी अभयारण्याच्या आजूबाजूला शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पशूंना मात्र बिबट्याची भीती आहे. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, कळंब, वाशी, भूम, परंडा या सहा तालुक्यात मागील तीन वर्षांपासून बिबट्याचा अधिवास दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या गाय, बैल, रेडकू, शेळी अशा पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ले केल्याचे प्रकार मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. रामलिंग अभयारण्य सोडून इतर भागात ६ ते ८ बिबट्यांचा अधिवास आपल्या जिल्ह्यात असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
यामध्ये भूम आणि परंडा या तालुक्यात बिबटे जास्त असण्याची शक्यता आहे. बिबट्याची ही संख्या पुढील काळात वाढत जाणार असल्यामुळे माणसानेच आता बिबट्याशी जुळवून घ्यायची मानसिकता ठेवावी असेही वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील महिन्यात वैराग परिसरात बिबट्याची दोन पिल्ले एका शेतकऱ्याला दिसून आली होती. म्हणजे बिबट्याचे या भागात प्रजनन सुरू असून, पुढील काळात बिबट्यांची संख्या वाढू शकते. या बिबट्यांना पकडणे अथवा त्यांचे प्रजनन रोखणे हा राज्य स्तरावरील विषय असून जिल्ह्यातील वनविभागाच्या हातात या गोष्टी नाहीत.
परिस्थितीशी जुळवून घेण्याची बिबट्यात कला –
बिबट्या हा प्राणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो. बिबट्यांचे वास्तव्य जंगलाबरोबरच जंगल परिसरातील गावांच्या आसपास, तसेच बागायती, ऊस क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर दिसते. बिबट्या माणसांच्या वस्तीच्या आजूबाजूला बिनधास्त वावरतात. बिबट्या हा चोरटा शिकारी आहे. जंगलात हा हरीण, माकड, वानर, छोटी रानडुकरे, साळिंदर, ससा अशी शिकार करतो.
जंगलाबाहेर शेळी, मेंढी, छोटे रेडकू, कोंबड्या, मोर यांची शिकार करतात. मनुष्यवस्तीजवळील भटकी कुत्री, डुक्कर ही त्याची सर्वांत आवडती शिकार आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीत बेडूक, उंदीर, घुशी, खेकडा खाऊन तो आपली भूक भागवतो. बिबट्या झाडावर सहज चढतो. त्यामुळे बिबट्याचे वास्तव्य शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे.
ऊसातली शिकार संपल्यास मानवी वस्तीत घुसू शकतो बिबट्या –
सध्या जिल्ह्यातील ऊसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच नवीन ऊस लागण वाढल्यामुळे बिबट्याला लपण्यास भरपूर जागा आहे. सध्या धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रानडुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्यांना सध्या मुबलक शिकार उपलब्ध आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढू लागला. ऊसातील रानडुकरे संपली तर हेच बिबटे खाद्याच्या शोधात पाळीव कुत्री, पाळीव प्राणी यांच्यावर होणारे हल्ले करतील. त्यामुळे वनविभागाने अगोदरच बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
मानव अन् बिबट्या संघर्ष अटळ –
धाराशिव जिल्ह्यात बिबट्याने मानवावर हल्ला केल्याची घटना अजून समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष समोर आलेला नाही. परंतु माणसावर बिबट्याने हल्ला केल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण, माणसाच्या रक्तात क्षाराचे प्रमाण जास्त असते. असे रक्त बिबट्याला जास्त आवडते असे अभ्यासक सांगतात. त्यामुळे मानवाच्या रक्ताची चटक बिबट्यांना लागली तर मानवावरील बिबट्याचे हल्ले वाढू शकतात.
पुढच्या दोन वर्षात २५ ते ३० बिबट्यांची भीती –
बिबट्याचा प्रजनन काळ मोठा आहे. दीड ते दोन वर्षाला मादी दोन ते तीन पिल्लांना जन्म देते. जिल्ह्यात सध्या दहा ते बारा बिबटे आहेत. यामध्ये किती नर आणि किती मादी याची माहिती वनविभागाला नाही. तरीही यामध्ये पाच मादी जरी गृहीत धरल्या तरी पुढच्या दोन वर्षात धाराशिव जिल्ह्यातील बिबट्यांची संख्या २५ ते ३० होऊ शकते.