धाराशिव जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना मिळणार 51 कोटी रुपये
आरंभ मराठी / धाराशिव
राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अखेर सहा महिन्यांनी शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेच्या निधी वितरणासाठी राज्य सरकारने बुधवारी (दि.26) 1642 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचा शासन आदेश काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना 51 कोटी रुपयांचा हप्ता मिळणार आहे. पुढील आठवड्यात हे पैसे वितरित होणार आहेत.
केंद्र शासनाने पीएम किसान ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये टप्प्याटप्प्याने दिले जातात. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारने गतवर्षी राज्य शासनातर्फे देखील शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गतवर्षी राज्य शासनाचे ६ हजार आणि केंद्र शासनाचे ६ हजार अशी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली होती.
परंतु, यापैकी राज्य शासनाचे पैसे सहा महिने झाले, तरी शेतकऱ्यांना प्राप्त झाले नसल्याने ही योजना बंद पडली की काय अशी विचारणा शेतकरी करत होते. कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी सन्मान निधीच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते.
त्यानंतर सहा महिने झाले तरी शेतकऱ्यांना सहावा हप्ता मिळाला नव्हता.किसान सन्मान निधीचा हप्ता मिळूनही एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यातच राज्य सरकारने बुधवारी या योजनेसाठी निधीची तरतूद केल्यामुळे हे पैसे पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जातील अशी शक्यता आहे.
2000 मिळणार की 3000 मिळणार ?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात. लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांची मदत केली जाते. महायुतीने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात ही रक्कम सहा हजार रुपयांवरून 9000 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सरकारकडून यावेळी 2000 रुपये मिळणार की 3000 रुपये मिळणार हे अजून जाहीर केले नसले तरी लाभार्थी शेतकऱ्यांना त्याची उत्सुकता लागली आहे.
ऍग्रीस्टॅक मध्ये 77 टक्के लाभार्थ्यांची नोंदणी –
सरकारकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांचे लाभ देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र देण्यासाठी ऍग्रीस्टॅक मध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 77 टक्के लाभार्थी शेतकऱ्यांनी यात नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक 100 टक्के नोंदणी वाशी तालुक्यात झाली आहे. तर तुळजापूर तालुक्यात सर्वात कमी केवळ 55 टक्के नोंदणी झाली आहे.
फार्मर आयडी सक्तीची –
शेतकऱ्यांकडे जमिनीचा सातबारा असतो. ज्याच्याकडे सातबारा आहे, तो शेतकरी हे त्रिकाल बाधित सत्य असले, तरी शासनाने फार्मर आयडीची मेख मारून ठेवली आहे. अनेक शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रामध्ये हेलपाटे मारत आहेत. त्यातच सर्व्हरची देखील समस्या उद्भवत आहे. जर फार्मर आयडी नसेल, तर पीएम किसान योजनेचेदेखील पैसे मिळणार नाहीत, अशी भीती शेतकऱ्यांना दाखवली जात आहे.
धाराशिव जिल्ह्यात 51 कोटींचे होणार वितरण –
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे धाराशिव जिल्ह्यात 2 लाख 57 हजार 744 लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी 2000 प्रमाणे हप्ता वितरित झाल्यास धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 51 कोटी 54 लाख रुपयांचे वितरण होणार आहे.
तालुका – लाभार्थी – ऍग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केलेली टक्केवारी
भूम – 25264 – 92%
धाराशिव – 46316 – 79%
कळंब – 34322 – 72
लोहारा – 16149 – 62%
उमरगा – 30689 – 86%
परंडा – 30100 – 71%
तुळजापूर – 57480 – 55%
वाशी – 17424 – 100%
एकूण – 257744 – 77%