आरंभ मराठी / धाराशिव
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज (दि.४) धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ काल समोर आल्यानंतर जनक्षोभ उसळला आहे.
काल या हत्या प्रकरणातील काही फोटो समोर आल्यानंतर यातील आरोपींविरोधात तीव्र भावना जनमाणसातून व्यक्त होत आहेत. दिनांक ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची पवनचक्की खंडणी प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तपास सुरू आहे.
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा वारंवार राजीनामा मागितला जात असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्व संघटनांतर्फे जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
नराधमाच्या क्रौर्याचा निषेध करण्यासाठी या बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांनी सहभागी होऊन माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करावा असे आवाहन करण्यात आले आहे.