प्रतिनिधी / कळंब/ धाराशिव
उमरगा पोलीस ठाणे हद्दीत लातूर रोडलगत सौदागर ऑर्केस्ट्रा व डान्स बारवर कळंब उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे छापा टाकून कारवाई केली. यामध्ये ५८ लाख ५१ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत बार चालक व नऊ महिलासह ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले.विशेष म्हणजे या डान्स बारमध्ये खोट्या नोटा उधळल्या जात असल्याचे समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने व अपर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याच्या माहितीवरून कारवाई करण्यास शुक्रवारी (दि.७) पहाटे दोनच्या सुमारास कळंब उपविभागा सहा.पोलीस अधीक्षक एम. रमेश उमरगा हद्दीत जकेकुर-चौरस्ता शिवारात आले होते. यावेळी गोपनीय माहितीवरून लातुर रोडलगत असलेल्या सौदागर बार व रेस्टारंट येथे नियमांचे उल्लंघन करत बार सुरू ठेवुन अवैधरित्या महिला नृत्यांगनावर पैसे उधळुन अश्लिल व बिभत्स हावभाव करून महिलांचे नृत्य चालु असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब व उमरगा पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने सौदागर बार व रेस्टॉरंट येथे छापा मारला.यात सौदागर ऑर्केस्ट्रा व रेस्टॉरंट येथे बार मॅनेजर, कामगारांनी नियमाचे उल्लंघन करीत रात्री उशीरापर्यंत बार चालु ठेवुन बारमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टीमवर गाणे लावुन बारमधील नऊ महिला उपस्थित लोकांसमोर अश्लिल हावभाव करून नृत्य करत सौदागर हॉटेल टेन लव्हर्स नावाचे कागदी कुपन (बनावट नोटा) स्टेजवरील नृत्य करणाऱ्या महिलांवर उडवत असताना आढळून आले. यावेळी बार चालकासह एकुण ३५ जणाविरूध्द वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात सहभागी आरोपीकडून रोख १ लाख ५ हजार ८३० रुपयासह सात कार, चार दुचाकी, २९ मोबाईल, सौदागर हॉटेल टेन लव्हर्स नावाचे कागदी कुपन असे एकूण ५८ लाख ५१ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.












