आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर, मुदत संपलेल्या अथवा मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर निवडणूक होऊन नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक नियुक्तीस मान्यता दिली आहे. या आदेशाचे काटेकोर पालन करून, कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या निर्णयाचा मोठा परिणाम धाराशिव जिल्ह्यावर होणार असून, जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील एकूण ४२८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायतीमध्ये
धाराशिव तालुका ६६, तुळजापूर ५३, उमरगा ४९, लोहारा २६, कळंब ५९, वाशी ३४, भूम ७१ आणि परंडा तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत.
पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषद गट व १२५ पंचायत समिती गणांची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, पुढील टप्प्यात उर्वरित २० जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करण्यासाठी प्रशासनाला साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका एप्रिल–मे २०२६ दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पावसाळ्यापूर्वीच या निवडणुका घेण्यासाठी प्रशासन आग्रही असून, तोपर्यंत साधारण चार ते पाच महिने ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती राहणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासनाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकांकडे राहणार असून, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










