धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी
चंद्रसेन देशमुख / आरंभ मराठी
धाराशिव; मी शब्दाचा पक्का आहे.एकदा शब्द दिला की माघार घेत नाही, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे छातीठोकपणे सांगणारे ते अजित दादा पवार तुम्हीच का ?, महायुतीमध्ये गेल्यानंतर तुम्ही बदललात की तुमचं विस्मरण वाढलंय, असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करू लागलेत. कारण, सहा महिन्यात अजित पवारांना दोन वेळा विस्मरण झाल्याचं धाराशिवकरांनी अनुभवलं आहे.
धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांना ऐनवेळी माघार घ्यायला लावून पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्चनाताई पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी अर्ज भरताना अजित पवारांनी जाहीर भाषणात प्रा. सुरेश बिराजदार यांना वाऱ्यावर सोडणार नाही, विधान परिषदेवर घेणार,असा शब्द दिला होता. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांना या शब्दाचाही विसर पडला. मंगळवारी विधान परिषदेवर राष्ट्रवादीच्या कोट्यातून प्रा.सुरेश बिराजदार यांच्याऐवजी छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं आहे. प्रा.बिराजदार यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी केलेली तयारी, केलेला खर्च यावर पाणी फेरलेच, शिवाय शेवटी पक्षाकडून निराशाच वाट्याला आली.
पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी सांगितल्यानुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सहा महिन्यांपासून तयारीला लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांचं तिकिट कापून ऐनवेळी भाजपातून प्रवेश केलेल्या अर्चनाताई पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्यानं स्वभाविकच प्रा.बिराजदार यांच्यासह कार्यकर्ते नाराज झाले होते. सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून टीका तसेच राजीनामा सत्र सुरू झालं होते. या पार्श्वभूमीवर अर्चनाताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी थेट प्रा.बिराजदार यांना जाहीर सभेत शब्द दिला. प्रा.बिराजदार यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना विधान परिषद सदस्य करणार. मंगळवारी राज्यपालांच्या कोट्यातील विधान परिषद सदस्यांची यादी जाहीर झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पंकज भुजबळ यांचे नाव घेण्यात आले आहे. प्रा.बिराजदार यांना पक्षाने पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडले आहे. अजित पवार शब्दाचे पक्के असतात,दिलेला शब्द फिरवत नाहीत,असाही समज कार्यकर्त्यांचा होता. धाराशिवच्या नेत्यांना अजित पवारांनी दिलेला शब्द न पाळल्याने त्यांच्यावरील विश्वासाला तडा गेलाच पण प्रचंड नाराजीची भावना वाढली आहे.
प्रा.बिराजदार यांनी मनाचा मोठेपणा दाखवला
खुद्द अजित पवारांनी तयारी करायला सांगितल्यानंतर मतदारसंघात जोरदार तयारी केलेल्या प्रा.बिराजदार यांना ऐनवेळी लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. हे शल्य कार्यकर्त्यांना बोचत होते. त्यामुळे अनेकांनी नाराजीतून राजीनामे देण्याची तयारी सुरू केली होती. त्यावेळी प्रा.बिराजदार यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांना पक्षाची अडचण सांगून संयम पाळा तसेच राजीनामा किंवा टीका करू नका, असे आवाहन केले होते. उमेदवारीचा दावेदार असूनही प्रा.बिराजदार यांनी मनाचा मोठेपणा दाखवल्याने दाजी तुम्ही उमेदवारीच्या स्पर्धेत हरलात तरी आमच्या मनात जिंकलात, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.
काय म्हणाले होते प्रा.बिराजदार .?
अजित पवारांचा विकासात्मक दृष्टिकोन पाहून आपण त्यांच्यासमवेत काम करत आहोत. राज्याला त्यांच्यासारख्या विकासाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता आहे. त्यांना संघर्षाच्या काळात एकटे पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. आपण सर्वजण त्यांचे कुटुंबीय बनून त्यांना साथ देण्याची गरज आहे. पुढील काही दिवसात अजितदादा आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देणे किंवा सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊन नाराजी व्यक्त करणे, हे प्रकार तत्काळ थांबवावेत.