-सज्जन यादव,धाराशिव (मो.96896 57871)
गेल्या चार दिवसात राज्याच्या राजकारणात ज्या अभूतपूर्व गोष्टी घडत आहेत,त्याचे रोज नवनवे अंक सुरूच आहेत. काल राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वेगवेगळे मेळावे घेतले. दोन्ही मेळाव्याना गर्दी होती. परंतु यात अजित पवारांची सरशी झालेली दिसते. अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांची भाषणं धक्कादायक होती. खूप वर्षांपासूनची सल या तिघांनीही काल बोलून दाखवली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भाषणात विशेष काहीच नव्हते. त्यांनी ना भावनिक आवाहन केले ना अजित पवार गटावर टीका केली. आम्ही जनतेत जाऊ असे जरी शरद पवार म्हणत असले तरी ते लोकांना कितपत अपील होईल याबद्दल शंका आहे. शरद पवार वारंवार १९८० चा दाखला देतात. त्यावेळी ६२ आमदार त्यांना सोडून गेले होते त्यापैकी नंतरच्या निवडणुकीत फक्त सहाच आमदार निवडून आले. १९८० ची ही घटना खरी आहे. त्यावेळी शरद पवारांचे वय फक्त चाळीस होते, शिवाय १९७८ ते १९८० या दोन वर्षात ते मुख्यमंत्री होते. त्यांनी पुलोदचा प्रयोग यशस्वी केला होता आणि ते राजकारणातील अमिताभ बच्चन बनले होते. शरद पवारांचे त्यावेळचे राजकारण प्रचंड आक्रमक होते. राजकारणातील त्यांची तेंव्हाची ताकद, समज आणि धमक याला सीमा नव्हती त्यामुळेच लोक शरद पवार या नावाला घाबरत होते.
परंतु तो काळ आता बदलला आहे. शरद पवार या नावाभोवती आजही प्रसिद्धीचे प्रचंड मोठे वलय आहे. परंतु १९८० चे शरद पवार आज नाहीत. त्यांचे वय त्यांच्यासोबत नाही. ज्यांना ते वारसदार म्हणून पुढे आणत आहेत त्या सुप्रिया सुळे पहिल्यापासूनच दरबारी राजकारणातील नेत्या आहेत. सुप्रिया सुळे या लोकांत मिसळून काम करू शकत नाहीत. सुप्रियांचे राजकारण हे कायम अजित पवार आणि शरद पवार या दोन कुबड्या घेऊन पुढे गेलेले आहे. आता संघर्षाची वेळ आल्यावर सुप्रिया सुळे यांच्या मर्यादा स्पष्ट दिसतात. दुसरी गोष्ट आहे सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या सौम्य भूमिकेची. त्या अजूनही अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत नाहीत.जोपर्यंत सुप्रिया सुळे या अजित पवारांप्रमाणे प्रोफेशनल राजकारणी बनू शकत नाहीत तोपर्यंत त्या पक्ष सांभाळू शकत नाहीत. त्यांना यावेळी पक्ष सांभाळायचा आहे की नाती सांभाळायची आहेत हे ठरवून दोन्हीपैकी एकाची निवड करावीच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर तीन महिन्यातच हा पक्ष सत्तेवर आला होता. राज्यात सलग पंधरा वर्षे आणि केंद्रात सलग दहा वर्षे सत्ता असल्यामुळे या पक्षात घाऊक प्रमाणात नेते तयार झाले. अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, विजयकुमार गावित, गणेश नाईक हे नेते सलग दहा-पंधरा वर्षे मंत्री राहिलेले आहेत. हे लोकं फक्त नेते नाहीत तर सुभेदार आहेत. जिकडे सत्ता तिकडे हे सुभेदार चाकरी करणार. सलग पंधरा वर्षे सत्ता असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षावर कधी संकट आलेच नाही. २०१४ नंतर मात्र गणेश नाईक, विजयकुमार गावित यासारख्या नेत्यांनी वाऱ्याची दिशा ओळखून भाजपला जवळ केले. राष्ट्रवादी पक्ष सोडून हे नेते भाजपा कडून निवडून आले. शरद पवार यांच्याकडून या नेत्यांची काहीच राजकीय हानी होऊ शकली नाही कारण हे नेते त्या त्या भागातील सुभेदार आहेत. तीच गोष्ट डॉ पद्मसिंह पाटील यांच्या पुत्राची. राणाजगजितसिंह पाटील यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला. एक महिन्यात त्यांनी त्यांच्या उस्मानाबाद मतदार संघातून निवडणूक न लढवता तुळजापूर मतदार संघातून निवडणूक लढवली आणि कित्येक वर्षे मंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा पराभव केला. यावरून एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शरद पवार या नावाशिवाय आणि त्यांच्या पक्षाशिवाय हे सुभेदार नेते कोणत्याही पक्षातून किंवा अपक्ष निवडून येऊ शकतात.
शिवसेनेत पडलेली फूट आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट यांमध्ये खूप मोठा फरक आहे. शिवसेना हा पक्ष भावनिक आणि व्यक्तिकेंद्री पक्ष आहे. फक्त बाळासाहेब ठाकरे या एका नावाला पाहून आजही शिवसेनेत मते मिळतात मग तो उमेदवार कोणीही असो. नारायण राणे यांच्याबाबतीत शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उदाहरण पाहता येईल. मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे या नेत्याला शिवसेना सोडल्यानंतर स्वतःचे वलय अजूनही निर्माण करता आलेले नाही. तसे राष्ट्रवादी पक्षाचे नाही. आजपर्यंत त्या पक्षाचा उमेदवारच तगडा असायचा. शरद पवार नावाची ताकद फक्त पुश करण्यासाठी असायची. साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात पावसात भिजलेल्या एखाद्या सभेचा अपवाद वगळला तर शरद पवार यांच्या एखाद्या सभेमुळे खूप मोठा उलटफेर होऊ शकतो हे दिवस आता राहिलेले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील धुसफूस आजची नाही. सत्तेशिवाय हा पक्ष फार काळ राहू शकत नाही याची जाणीव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पहिल्यापासून होती. राष्ट्रवादीच्या एकूण एक सुभेदार असणाऱ्या नेत्यांचे हात भ्रष्टाचार नावाच्या मोठ्या दगडाखाली अडकलेले आहेत. ईडी-सीबीआय च्या धाकाने हे दगड हलवले की या सुभेदारांना वेदना होतात. छगन भुजबळ सारख्या नेत्यांना या वेदना किती तीव्र आहेत याची पुरेपूर जाणीव आहे. हसन मुश्रीफ सारखे बरेच नेते सुपात होते, जात्यात जाण्याच्या अगोदर त्यांना ठोस कृती करणे अपरिहार्य होते. अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या सुप्त इच्छेला राष्ट्रवादीमार्फत फळ मिळेल याची सध्या शाश्वती नाही. विचारसरणी वगैरे या न पचणाऱ्या गोष्टी अजित पवार सारखे महत्वाकांक्षी नेते कधीच करत नसतात. प्रफुल्ल पटेल सारखे राजकीय दलाल ‘हा ही चांगला’, ‘तो ही चांगला’ या नाना पाटेकर सारख्या भूमिकेत असतात. दिल्लीत राहून प्रत्येक दरबारात मुजरा घालून खबरबात घेणे ही कला काही लोकांना उत्तम जमत असते. शरद पवारांसाठी हे लोक सत्ता असेपर्यंत उपयोगाचे असतात. परंतु सत्ता नसते तेंव्हा या लोकांचे उपद्रव मूल्य प्रचंड हानिकारक असते.
सुप्रिया सुळे दिल्लीत रमणाऱ्या राजकारणी आहेत. त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून द्यायची जबाबदारी देखील अजित पवार हेच पार पाडत होते. प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील हे मास लीडर नाहीत. फक्त प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे लोक त्यांना जास्तीचा भाव देत होते. एरव्ही त्यांची ताकद त्यांच्या जिल्ह्यापुरती देखील नाही. परंतु एकाही भ्रष्टाचारात त्यांचे हात बरबटलेले नाहीत ही त्यांची जमेची बाजू आहे. ज्या जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल अजित पवार गटाला आकस आहे त्या जितेंद्र आव्हाड यांची ताकद मुंब्रा या त्यांच्या मतदारसंघापुरती मर्यादित आहे. युवानेते आणि राष्ट्रवादीचे भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या रोहित पवार यांना त्यांच्याच कर्जत-जामखेड मध्ये पुढची निवडणूक तितकी सोपी नसणार आहे. शिवसेनेची झाली त्यापेक्षा राष्ट्रवादीची हानी खूप मोठी आहे. उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे तशी शरद पवार यांना सहानुभूती कितपत मिळेल याबद्दल शंका आहे कारण अजित पवार गटाने केलेला हल्ला शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर केलेला आहे.
टीप-सध्याचं चाललेलं राजकारण सामान्य माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडले आहे.जास्त विचार करू नये अन्यथा दिगू टिपणीससारखी भ्रमिष्ट होण्याची वेळ येईल.