आरंभ मराठी / कळंब
कळंब शहराच्या नगराध्यक्षा सुनंदाताई शिवाजी कापसे यांनी नागरिकांची माफी मागितली असून, बेजबाबदार व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही सार्वजनिक करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कळंब शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवरील कचरा नगरपरिषदेकडून उचलण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कळंब नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुनंदा शिवाजी कापसे यांनी नागरिकांची माफी मागत परिस्थिती स्पष्ट केली आहे.
मुख्य बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्यापाऱ्यांचा कचरा संकलित करण्यासाठी नगरपरिषदेची घंटागाडी ठराविक वेळेत येत असते.
मात्र काही जणांनी कचरा थेट रस्त्यावर टाकल्यामुळे स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या भागात घंटागाडी वेळेत येत नसेल, त्या भागातील नागरिक व व्यापाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा थेट फोनद्वारे माहिती द्यावी. त्या ठिकाणी वेळेत घंटागाडी पाठवण्याची व्यवस्था नगरपरिषद निश्चितपणे करेल, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
मात्र शहर अस्वच्छ करण्याचे बेजबाबदार वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हा नगरपरिषदेचा प्राधान्याचा विषय असून यात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या काही व्यापाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज नगरपरिषदेकडे उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते सार्वजनिक करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत जबाबदारीने वागण्याचे आवाहन त्यांनी व्यापारी वर्गाला केले आहे.








