आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव-कळंब तसेच भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार देण्याचा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून आज सायंकाळी जाहीर केला आहे. तुळजापूर आणि उमरगा लोहारा मतदारसंघाबाबत काही वेळातच निर्णय होण्याची शक्यता आहे.
धाराशिव तसेच परंडा मतदारसंघातून कोण उमेदवार याबाबतची घोषणाही रात्रीपर्यंत होण्याची शक्यता आहे. या दोन्ही मतदारसंघातील विद्यमान आमदारांना मात्र यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाच्या वतीने काही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय मनोज पाटील यांनी घेतला असून, धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तसेच परंडा मतदारसंघातून मराठा उमेदवार देण्याचा महत्वाचा निर्णय झाल्याची माहिती आहे. तुळजापूर तसेच उमरगा मतदारसंघाबाबत पाटील कोणती भूमिका घेतात,याकडेही लक्ष लागले आहे. तुळजापूर मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार न देता सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचे आदेश येतील,अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उमरगा मतदारसंघात जरांगे पाटील कोणाला पाठिंबा देतात याकडेही लक्ष लागले आहे.
धाराशिव -परंडाचे उमेदवार कोण, उत्सुकता कायम
मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव तसेच परंडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, या दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी पाच उमेदवारांपैकी एकाला रात्री उशिरापर्यंत उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते. हे उमेदवार कोण याची उत्सुकता मात्र जिल्ह्याला लागू राहिली आहे.