आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षणाच्या भूमिकेशी सहमत असलेले उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्यानंतर इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र यातून एकच उमेदवार निवडण्याची प्रक्रिया कठीण आहे.त्यामुळे इच्छुकांमध्ये एकमत करा,असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते.त्यावर एकमत होत नसले तरी संभाव्य फूट टाळण्यासाठी जरांगे पाटील देतील त्याच उमेदवारांना निवडून आणू, आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊ, अशी शपथच धाराशिवमधील इच्छुक उमेदवारांनी शनिवारी झालेल्या बैठकीत घेतली असून, हे शपथपत्र अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
मराठा समाजासोबत मुस्लिम तसेच दलित समाज एकजुटीने विधानसभेची निवडणूक लढवणार असून, उद्या म्हणजेच रविवारी सायंकाळी उमेदवारांच्या नावाची घोषणा अंतरवाली सराटीतून स्वतः मनोज पाटील करणार आहेत. मात्र प्रत्येक मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याने आणि यातून एकाचीच निवड करायची असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र आपण सांगितल्यानंतर एकानेच उमेदवारी अर्ज ठेवायचा आणि अन्य इच्छुकांनी अर्ज मागे घ्यायचे, असे आवाहन मनोज पाटील यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो, हे चार तारखेलाच कळणार आहे. मात्र धाराशिवमधील 19 इच्छुक मराठा उमेदवारांनी शनिवारी दुपारी शहरात बैठक घेतली. ही बैठक नावावर एकमत करण्यासाठी होती.या बैठकीला काही राजकीय पक्षाचे तसेच आंदोलनात सक्रिय असलेले इच्छुक कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी सर्वांच्या बोलण्यात एकवाक्यता आली.
शपथपत्र दिल्याने वाद संपुष्टात
मनोज पाटील यांनी दिलेल्या कोणत्याही एका उमेदवाराचा जोरकसपणे प्रचार केला जाईल आणि अन्य सर्व इच्छुक उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. इच्छुक उमेदवारांची ही एकवाक्यता तत्कालीक आहे की कायम राहणार, यासंदर्भात संभ्रम नको म्हणून काही आंदोलकांनी ही बाब शपथपत्रावर लिहून देण्याची सर्व इच्छुक उमेदवारांकडे विनंती केली. तेव्हा सर्व इच्छुक उमेदवारांनी शपथपत्रावर लिहून दिले. त्यात आम्ही इच्छुक उमेदवार मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराचाच प्रचार करू, अन्य सर्व इच्छुक उमेदवार माघार घेऊ. लिहून दिलेले शपथपत्र शनिवारी सायंकाळी आंदोलकांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे धाराशिव मतदारसंघात मराठा समाजाचा एकच उमेदवार राहील, बंडखोरी किंवा गोंधळ होणार नाही,अशी सध्याची एकंदर स्थिती आहे.
जरांगे- पाटलांची संकल्पनेला दाद
धाराशिवचे शिष्टमंडळ शनिवारी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले.त्यांनी धाराशिवच्या इच्छुक उमेदवारांनी दिलेले शपथपत्र दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी या संकल्पनेचे कौतुक केले.या पद्धतीने अन्य मतदारसंघातून देखील शपथपत्र घेण्याचा निर्णय झाला.त्यानुसार अन्यत्र अशाच पद्धतीने शपथपत्र दिले जात आहेत. या शपथपत्रामुळे मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांमध्ये अंतर्गत बंडखोरी किंवा वाद वाढणार नाहीत, असा दावा मनोज जरांगे यांचे समर्थक करत आहेत.
उद्या सायंकाळी ठरणार उमेदवार
मराठा समाजाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उमेदवाराची उद्या सायंकाळी मनोज पाटील घोषणा करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात राजकीय समीकरण बदलणार आहे.मनोज जरांगे पाटील कोणाला उमेदवारी देतात याकडे मतदारसंघांचे लक्ष लागले आहे.