सरकार विरोधात सकल मराठा समाजाचा आक्रोश
आरंभ मराठी / धाराशिव
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांजा येथील मराठा बांधवांकडून चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे. धाराशिव शहर बेमुदत बंद ठेवून हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले.
सांजा गावातील नागरिकांनी १८ बैलगाड्या घेऊन सकाळीच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धडक दिली. चौकातील सर्व रस्त्यावर या बैलगाड्या उभा करून हे आंदोलन केले जात आहे. रस्त्यावरच बैलांच्या चाऱ्या पाण्याची सोय करून आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. आजपासून संपूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी पेटवून देऊ, त्याची सुरुवात धाराशिव शहरातून झाली आहे,असा इशारा देण्यात आला आहे.
मनोज जरांगे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं या घोषणांनी शिवाजी महाराज चौक दणाणून गेला. शेकडो मराठा युवक आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. काही वेळात ५० बैलगाड्या या चौकात आम्ही उभ्या करू, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. चक्का जाम आंदोलनामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा झाला असून, पर्यायी मार्गाचा वापर केला जात आहे.या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.