अंतरवाली सराटीमध्ये उद्या उमेदवारांच्या अंतिम मुलाखती, धाराशिव जिल्ह्यातील तीन मतदारसंघात उमेदवार देणार
आरंभ मराठी / धाराशिव
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी निवडून येतील,अशा ठिकाणी विधानसभेला उमेदवार देण्याची घोषणा केल्यापासून जिल्ह्यातील धाराशिव-कळंब, भूम-परंडा आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार असतील, याची उत्सुकता आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. धाराशिव विधानसभा मतदारसंघातून उच्चशिक्षित आणि संस्थात्मक, सामजिक कार्य असलेले असलेले दोन डॉक्टर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नितीन लांडगे धाराशिव मतदारसंघातून उमेदवारीची मागणी करत आहेत. तुळजापूर मतदारसंघातून ॲड. योगेश केदार यांची मागणी आहे. यासोबत काही राजकीय पक्षाचे नेते उमेदवारीसाठी आग्रही आहेत. जरांगे पाटील या चेहऱ्यांना संधी देतात की आंदोलक तरूणांना रिंगणात उतरवतात,याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, यासंदर्भात उद्या (दि.24) अंतरवाली सराटी येथे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.त्यानंतरच उमेदवार निश्चित होतील, असे सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रीय असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील चारपैकी तीन विधानसभा मतदारसंघात मराठा उमेदवार देण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय झाला असून, त्यासाठीची तयारीही सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले कार्य अहवाल यापूर्वीच जरांगे पाटील यांना दिले आहेत. या अहवालासोबतच मराठा समाजाच्या आंदोलनाच्या लढ्यात दिलेले योगदान आणि एकूणच सामाजिक कार्याचा आवाका विचारात घेऊन जरांगे पाटील उमेदवारांची निवड करतील, असे सांगण्यात येत आहे. उमेदवार दिलेली जागा निवडून आलीच पाहिजे, अशी जरांगे पाटील यांची भूमिका आहे. त्यासाठी उमेदवार निवडीसाठी निकष ठरले आहेत.
रस्त्यावर लढणाऱ्या तरूणांची भूमिका मोलाची
धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलनाची चळवळ कायम ठेवणाऱ्या तरूणांनीही उमेदवारीची मागणी लावून धरली आहे. आंदोलनादरम्यान अनेक तरूणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.वेळ, श्रम आणि प्रशासकीय कारवाया, असा त्रास झालेल्या तरूणांनी आपल्यापैकीच कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. मात्र तरीही निवडून येण्यासाठी सक्षम असलेल्या व मराठा समाजाची आरक्षणाची भूमिका परखडपणे मांडणाऱ्या अन्य राजकीय पक्षातून येणाऱ्या उमेदवारांना जरांगे पाटील यांनी संधी दिली तरी तरूण कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. यामध्ये रस्त्यावर लढणाऱ्या तरूणांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
३ विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार
धाराशिव – कळंब विधानसभा: अतुल गायकवाड,डॉ.प्रतापसिंह पाटील,डॉ.दिग्गज दापके, बलराज रणदिवे, संकेत सूर्यवंशी, घनश्याम रितापुरे, धैर्यशील सस्ते, अक्षय नाईकवाडी, ओम सूर्यवंशी, चेतन कतरे, नितीन लांडगे.
–
तुळजापूर-
सज्जनराव साळुंके, मनोज जाधव, उमेश मगर,तानाजी पिंपळे,गणेश साळुंखे, विक्रम पाटील,प्रतिक रोचकरी, योगेश केदार, देवानंद रोचकरी,ॲड. व्यंकटराव गुंड.
–
भूम-परांडा-
डॉ.प्रतापसिंह पाटील, विलास पवार,विशाल देवकर, गोरख भोरे, प्रशांत चेडे, प्रसाद सातपुते, दिनेश मांगले, सयाजी हुंबे, मयूर गायकवाड.
–