महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत बिघाडीची शक्यता, नेत्यांच्या महत्वकांक्षा अधिकृत उमेदवारांना अडचणीत आणणार
चंद्रसेन देशमुख / आरंभ मराठी
धाराशिव : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, उमेदवारीसाठी देव पाण्यात घालून बसलेल्या इच्छूक नेत्यांनी मुंबईत ठाण मांडले असून, उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू झाली आहे. तुळजापूरची जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील एक इच्छूक नेता उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. या नेत्याने उमेदवारीसाठी मुंबईतील पक्षनेत्यांकडे जोरदार फिल्डींग लावली असून, हा प्रवेश रोखण्यासाठी मात्र काँग्रेस नेत्यांची दमछाक सुरू झाली आहे. लोकसभेला महायुतीच्या जागा वाटपात धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सुटल्याने अर्चनाताई पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.विधानसभेतही जिल्ह्याच्या राजकारणात ऐनवेळी असे प्रकार घडण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात यावेळी चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. विशेषत: अडीच वर्षापूर्वी झालेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, महाविकास आघाडी आणि महायुतीमधील एकूण सहा राजकीय पक्षांमध्ये निवडणुका लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढणार आहे. जिल्ह्यातील विद्यमान आमदारांना कोण कोण आव्हान देणार, तुल्यबळ लढत कुठे आणि कशी होणार, हे अद्याप निश्चित नसले तरी बंडखोरीच्या माध्यमातून विद्यमान आमदारांची डोकेदुखी होणार हे निश्चित आहे. जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला जागा सुटण्याची शक्यता असून, या जागेवर उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीमधील एक इच्छुक नेता पक्षांतर करण्याच्या तयारीत आहे. नेत्याने पक्ष पातळीवर फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींचे या नेत्याला पाठबळ असल्याने काहीही होऊ शकते, अशी भिती काँग्रेस नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून काँग्रेस पक्षात येऊन निवडणूक लढवू पाहणाऱ्या नेत्याला रोखण्यासाठी काँग्रेसचे दोन्ही गट अलर्ट मोडवर आले आहेत. मंगळवारी विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाली असून, बुधवारी महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघातून कोणाकोणाला उमेदवारी मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दोन जागा उबाठा गटाला ?
बुधवारी महाविकास आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव-कळंब आणि उमरगा-लोहारा या दोन जागा उबाठा शिवसेना पक्षाला मिळण्याची शक्यता असून, तुळजापूर काँग्रेस तर भूम-परंडा-वाशी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे.