प्रतिनिधी/ मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणातला आज जो काही राजकीय भुकंप झाला, त्याविषयी नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातले सत्तानाट्य कधी थांबणार? महाराष्ट्राचा विकास कधी होणार? राजकारण म्हणजे सत्ताकारण का? महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही समस्यापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे का? लोकशाहीसारख्या देशात सामान्य माणसाच्या मूलभूत हक्काकडे दुर्लक्ष करून लोकशाहीला पायदळी तुडवत राजकारणातली ही संगीत खुर्ची कधी थांबेल, असे असंख्य प्रश्न विचारून सामान्य लोकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील दिगू टिपणीस झालाय,अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रातल्या या राजकारणाविषयी सोशल माध्यमावरून आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं त्याचा पहिला अंक आज पार पडला.पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली. यथावआकाश दुसरी पण सत्तेच्या स्वप्नासाठी रुजू होईलच, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे पुढे म्हणाले,यात देशासमोर चित्र काय उभा राहतंय तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल..ज्या राज्याने देशाचे प्रबोधन केले, त्या राज्याचे राजकारण इतक्या खालच्या थराला गेले आहे, हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय वाढवुन ठेवले आहे हा विचार करून मनात धस्स होतं..!
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमामधील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपनीस’ झाला आहे असे म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनता बेसावध सोशिक आहे, याची खात्री असल्यामुळे या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच चालू राहणार की येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचा हे किळसवानं राजकारण बंद करेल, असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी या सत्तेच्या घोडेबाजारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.