आरंभ मराठी / धाराशिव
दबाव टाकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले घर फोडले, असा गौप्यस्फोट करत याचे पाप त्यांना कधी ना कधी फेडावेच लागेल,असे गंभीर विधान माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले आहे. मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी आजारी असतानाही ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर मधुकर चव्हाण यांच्याकडे संशयाने बघितले जात आहे. त्यामुळे आता त्यांनी भाजपच्या नेत्याचे थेट नाव घेऊनच घर फोडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चव्हाण कुटुंबावर भाजपच्या यंत्रणेचा कोणता दबाव होता,असा प्रश्न उपस्थित विचारला जात आहे.
धाराशिव तालुक्यातील येवती येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री चव्हाण यांनी मुलाच्या भाजप प्रवेशाचा खुलासा केला आहे.
आमदार राणा पाटील यांच्यावरही टीका
चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा पक्ष काँग्रेसने लावलेले ग्रामीण भागाच्या विकासाचे रोपटे तोडण्याचे काम करीत आहे. तसेच आमचे घर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडले असून, आम्हाला अस्वस्थ करून आमची बदनामी केली आहे. याचे दुःख आम्हाला असून, तुम्हाला ते कधी ना कधी हे पाप फेडावेच लागेल. विशेष म्हणजे मी ९० वर्षांचा तरुण पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी तयार असून, म्हातारा बैलच चांगली पेरणी करू शकतो, खोंडावर पेरणी व्यवस्थित होत नसल्याचे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरही टीका केली. चव्हाण म्हणाले की, मी २२ व्या वर्षी राजकारणात आलो असून, पूर्वी देखील हेवेदावे व गटबाजी होती. त्यावेळी विचारांची लढाई होती.मात्र आज घरात घुसून मारायचे प्रकार वाढले असून, ही कोणती संस्कृती आहे.
तालुक्याचा विकास केला
चव्हाण म्हणाले, मी १९८५ साली उस्मानाबाद विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसच्या तिकिटावर डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात उभा राहिलो. आम्ही कधी गुंडगिरी केली नाही. मात्र गुंडगिरीच्या विरोधात आम्ही ताकद वापरली. मात्र त्यावेळी माझा अवघ्या ४ हजार मतांनी पराभव झाला. तुळजापूर तालुक्याची ओळख दगड व कुसळी तालुका म्हणून होती. ठिकठिकाणी तलाव बांधून पाणी अडविल्यामुळे संपूर्ण तालुका हिरवागार झाला आहे. गोरगरिबांच्या विकास कामाला पडणे हे काम मी सत्तेत असताना केले व आता देखील त्यांच्या मदतीला धावून जात आहे.
भाजपवर गंभीर आरोप
मागच्या निवडणुकीत तुम्ही मला मतदान केले. मात्र पराभव झाल्याने तुमच्या मताचा अवमान झाला आहे तो अवमान भरून काढण्यासाठी पुन्हा मला निवडून द्यावे. माझ्या सत्तेच्या काळात विविध जाती धर्मातील २१ लोकांना पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष व सभापती केले. मात्र माझ्या घरच्या मुलांची भावना आमच्यासाठी काही केले नाही, अशी झाल्यामुळे त्यांनी गैरसमजुतीने भाजपात प्रवेश केला. किंबहुना भाजपने कोणत्या कारणाने दबाव टाकून प्रवेश करून घेतला याचा किस्साच त्यांनी सांगितला. तसेच राज्यातील अनेक घरांनी संपूर्ण सत्तेचे ऐश्वर्य भोगून फुटली व फोडली असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने सत्तेत असताना सर्व समाजाची एकता ठेवण्याचे काम केले. मात्र भाजपने समाज फोडण्याचे व दंगे करण्याचे काम केले व करीत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
आता भाजप सत्तेत येणार नाही
विशेष म्हणजे सत्ताधारी असलेल्या महायुतीला पुन्हा आपली सत्ता येणार नाही, हे माहीत झाले आहे. तशी त्यांची खात्री देखील झाली असून, त्यांना कळून ते चुकले आहे. कोणत्याही परिस्थितीत ते पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाहीत. त्यामुळे ते निवडणुका पुढे ढकलण्याचा अट्टाहास करीत आहेत,असा हल्लोबोल चव्हाण यांनी केला.
………….
लक्ष्मण सरडे, पडवळ पुन्हा काँग्रेसमध्ये..
ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले लक्ष्मण सरडे, रोहित पडवळ, अशोक शिंदे, मुकुंद पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अश्रुबा माळी यांच्यासह इतरांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करीत घरवापसी केली आहे.यानिमित्ताने मधूकर चव्हाण यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ताकद उभी करायला सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
–
जिल्हाध्यक्षांनी पाठ फिरवली
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. वास्तविक पाहता धीरज पाटील यांच्यापेक्षा मधुकरराव चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. शिवाय चव्हाण यांचा अनुभव आणि पक्षातील ताकद विचारात घेता पक्ष चव्हाण यांनाच उमेदवारी देईल अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मतदारसंघात फिरून संवाद मेळावे आयोजित केले आहेत. त्यांनी आपल्याला शेवटची संधी द्यावी असे आवाहन करायला सुरूवात केली आहे. काँग्रेसच्या या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष धीरज पाटील दिसत नाहीत. त्यामुळे त्यांनी आतापासूनच चव्हाण यांची साथ सोडली असल्याची चर्चा सुरू आहे.