अमोल सुरवसे / आरंभ मराठी
नारंगवाडी ; उमरगा तालुक्यातील नारंगवाडी परिसरात बिबट्याच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभाग मात्र कोणतीही कार्यवाही करत नसल्याने शेतकरी दहशतीखाली आहेत. कारण सध्या ऊसतोड सुरू आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रब्बीच्या पिकांना पाणी देण्याची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून शेतात जावे लागते. प्रशासनाच्या बेजबाबदार भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आज ३० डिसेंबर रोजी सकाळी नारंगवाडी येथील दगडू पाटील यांच्या शेतात बिबट्या दिसल्याची घटना घडली. ही बाब नेताजी सोमवंशी यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे स्पष्ट केले असून, घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला संबंधित अधिकाऱ्यांनी फोन उचलण्याचीही तसदी घेतली नाही. नंतर संपर्क झाल्यावर मिळालेले उत्तर अधिकच धक्कादायक ठरले. गाडी नाही, बिबट्या नाही, लोक खोटं बोलत आहेत,अशी उडवाउडवीची उत्तरे देत तातडीची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
दरम्यान, या घटनेबाबत आरंभ मराठीचे प्रतिनिधी अमोल सुरवसे यांनीही वनविभागाशी संपर्क साधला असता, त्यांनाही केवळ वेळ लागेल, असे उत्तर देण्यात आले. जीवघेण्या परिस्थितीतही वनविभागाकडून तात्काळ हालचाल न होणे, ही बाब नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट खेळ करणारी असल्याचे बोलले जात आहे.
नारंगवाडी परिसर हा शेतीप्रधान भाग असून सकाळच्या वेळेत शेतकरी, महिला, लहान मुले व जनावरे मोठ्या प्रमाणावर बाहेर असतात. अशा परिस्थितीत बिबट्याची उपस्थिती ही मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देणारी असतानाही घटनास्थळी पथक पाठवणे, पाहणी करणे, पिंजरे लावणे किंवा नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे यापैकी एकही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
एखादी दुर्घटना घडल्यानंतरच वनविभाग जागा होणार का, असा थेट सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार सूचना देऊनही नागरिकांवरच खोटं बोलत आहेत,असा आरोप केला जात असेल, तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
तात्काळ वनविभागाचे पथक घटनास्थळी पाठवावे, परिसरात गस्त वाढवावी, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची स्पष्ट जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नारंगवाडी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित वनविभागावरच राहील, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.









