वन विभागाची कारवाई, आता वाघाची शोध मोहीम आरंभ मराठी / परंडागेल्या चार महिन्यांपासून परंडा आणि भूम तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला असून, परंडा भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःस्वास सोडला. आता वन वाघाला पकडण्याचे वन विभागासमोर आव्हान असणार आहे.परंडा तालुक्यात मागील काही महिन्यांपासून बिबट्याने पाळीव जनावरांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली होती. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर गुरुवारी (दि.२०) रात्री साडेअकरा वाजता परंडा तालुक्यातील कपिलापुरी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात आले.त्यापूर्वी बुधवारी (दि.१९) बिबट्याने एका शेळीवर हल्ला केला होता. तर त्याच दिवशी एका रेडीवर देखील हल्ला केला होता. बिबट्या सलग दोन दिवस हल्ले करत असल्याने वनविभागाने त्या भागात बुधवारी (दि.१९) पिंजरा लावला होता. त्या पिंजऱ्यात एक बोकड बांधण्यात आले होते. परंतु, पिंजऱ्याचा गज तुटल्याने पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या बुधवारी बोकड घेऊन पसार झाला होता. वनविभागाने गुरुवारी पुन्हा सायंकाळी सहा वाजता त्या भागात पिंजरा लावला होता.त्या पिंजऱ्यात रात्री सव्वा अकरा वाजता बिबट्या जेरबंद झाला. सध्या बिबट्याला पुणे जिल्ह्यात घेऊन गेले असल्याची माहिती आहे. एकीकडे वाघाला पकडण्यासाठी दोन महिन्यांपासून प्रयत्न केले जात असताना तो हाती लागत नसताना, परंडा तालुक्यात मात्र बिबट्या जेरबंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.