जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत
सूरज बागल/ आरंभ मराठी
तुळजापूर; तुळजापूर तालुक्यातील कामठा गावातील एका गाईची शिकार केल्यानंतर बिबट्याने परत एकदा मंगळवारी संध्याकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास कात्री येथील शेतकरी सचिन देशमुख यांच्या दोन वर्षाच्या गाईच्या वासराची शिकार केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात 21 जनावरे दगावली आहेत.
बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. तुळजापूर तालुक्यातील कात्री, कामठा या गावाच्या आसपास बिबट्याचा वावर सुरु असून, कामठा गावात शिकार केल्यानंतर कात्री येथील सचिन देशमुख यांची जमीन फॉरेस्टजवळ एक किलोमीटरच्या अंतरात आहे. त्यांच्या गायीचे दोन वर्षाचे वासरू त्यांनी बाहेर बांधले होते.
मंगळवारी रात्री नऊच्या नंतर ते शेताकडे गेले असता, त्यांना गाईचे वासरू मृत अवस्थेत आढळून आले. वासराची बिबट्याने शिकार केली असून, दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करणे गरजेचे असून, अजून नुकसान होण्याआधीच बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकरी करत आहे. वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याचा ठावठिकाणा नेमका कोठे आहे, याचा शोध घेतला जात आहे.