शाम जाधवर / कळंब
१ जानेवारी म्हणजे नववर्षाच्या पहिल्याच सकाळी कळंबकरांची सुरुवात प्रेरणादायी आणि आनंदमयी होणार आहे. कारण नववर्षाच्या पहिल्या सकाळी कळंब शहरात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे.
कळंब येथील स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने नवीन वर्षाची सुरुवातच प्रेरणादायी आणि आरोग्यवर्धक करण्यासाठी “कळंब मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन केले आहे. मागील सात वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो.
दौडगी जनता – तो बनेगी एकता, हे ब्रीदवाक्य घेऊन या मॅरेथॉन स्पर्धेतून सामाजिक ऐक्याचा संदेशही दिला जातो.
अडीच किमी अंतराची ही मॅरेथॉन असेल. १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी 6 वाजता शहरातील नगर परिषद शाळा क्र.1′ पासून या मॅरेथॉनला सुरुवात होणार असून, डिकसळ येथील ‘केंम्ब्रिज इंग्लिश स्कूल’ पर्यंत सकल कळंबकर आणि सोबतच राज्यभरातील स्पर्धक या स्पर्धेत धावणार आहेत.
वयोमर्यादेनुसार वेगवेगळ्या ५ गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. वय वर्ष ६ ते १५ मुली, ६ ते १५ मुले, खुला गट महिला व पुरुष, वय वर्ष ४५ पुढील असे ५ गट असणार आहेत. पाचही गटातील विजयी स्पर्धकांना विविध बक्षिसे आणि सन्मानचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरु असून सोलापूर, मुरूम, धाराशिव, लातूर अशा विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. शेवटचे २ दिवस शिल्लक असून, जास्तीत जास्त स्पर्धकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन कथले आघाडीचे बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, यश सुराणा यांनी केले आहे.