आरंभ मराठी / धाराशिव :
कळंब तालुक्यातील मोहा गावात सोमवारी (दि. 25) पारधी समाज आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला. मंगळवारी हा तणाव दगडफेकीत परिवर्तीत झाला असून यात पोलिस दलातील जवानांसह काही नागरिक जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असून गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
—
वादाचे कारण काय?
माहितीनुसार, गावातील सरकारी दवाखान्यामागील ग्रामपंचायतीच्या जागेवर पारधी समाजातील लोक अंत्यविधी करण्यासाठी आले होते. मात्र, ही जागा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी पारंपरिक स्वरूपात वापरली जाते. देवीची पालखी देखील याच ठिकाणी येते, त्यामुळे धार्मिक श्रद्धा लक्षात घेता गावकऱ्यांनी या जागेवर अंत्यविधी करण्यास नकार दर्शविला.
—
सोमवारी वाद, मंगळवारी दगडफेक
या पार्श्वभूमीवर सोमवारी पारधी समाज आणि गावकरी यांच्यात वाद झाला. पोलिसांनी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंगळवारी सकाळी तहसीलदारांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतरही दोन्ही गटांत पुन्हा वाद उफाळला. यानंतर झालेल्या दगडफेकीत पोलिस आणि गावकरी जखमी झाले.
—
जखमींवर उपचार
या दगडफेकीत एक नागरिक गंभीर जखमी झाल्याने त्याला कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर तब्बल 15 पोलिसांसह काही नागरिकांना मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहे.
पोलिसांचा वाढीव बंदोबस्त
घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी स्वतः घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुढील अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सध्या मोहा गावात तणावाचे वातावरण असून प्रशासनाने ग्रामस्थ व पारधी समाजाशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.