आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध धंदे व बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तुळजापूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध गावठी कट्टा जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व पथक गस्त करत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की धाराशिव जिल्हा अभिलेखावरील पाहिजे असलेला आरोपी गणेश उर्फ गणेशा जंपाण्या भोसले (रा. कारला, ता. तुळजापूर) हा त्याच्या राहत्या घरी असून त्याच्याकडे गावठी कट्टा आहे व तो चोरीच्या उद्देशाने जाणार आहे.
ही खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी (दि.30) सकाळी पावणे बारा वाजता पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. आरोपी घराच्या पाठीमागे चिंचेच्या झाडाखाली बसलेला आढळून आला. पोलीस पथकाला पाहताच त्याने गावठी कट्टा तिथेच फेकून पळ काढला. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी अवैध गावठी कट्टा जप्त केला.
या प्रकरणी पोस्टे नळदुर्ग येथे भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेला गावठी कट्टा पुढील कारवाईसाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह/ शौकत पठाण, पोह/ जावेद काझी, पोह/ प्रकाश औताडे, पोह/ फरहान पठाण, मपोह/ शोभा बांगर व चापोह/ रत्नदीप डोंगरे यांनी केली आहे.









