सर्व सदस्य शहरात सभेपूर्वी पोहचणार
सूरज बागल/आरंभ मराठी
तुळजापूर: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही तासात पार पडणार असून, यासाठी विशेषतः सत्ताधारी भाजपाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या एक महिन्यापासून सहलीवर असलेले सदस्य पहाटेच्या वेळी धाराशिव शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळजापूरमध्ये दाखल झाले असून, सदस्य थांबलेल्या हॉटेलला मोठी खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भाजपच्या सदस्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचेही काही सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलमधूनच सर्व सदस्य दुपारी सभा सुरू होण्याआधी धाराशिवसाठी रवाना होणार आहेत.
जिल्हा परिषद निवडणूकीचा निकाल लागून महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहूमत नसल्याने अध्यक्षपदासाठी चढाओढ सुरू आहे. गेल्या अनेक दिवसापासून अध्यक्षपदी कोण याची चर्चा होत आहे.कोणताही दगा फटका होवू नये यासाठी निकाला दिवशीच भाजपने आपल्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे काही सदस्य सहलीसाठी पाठवले होते. ते सर्व सदस्य आता जिल्ह्यात दाखल झाले असून,त्यांना कडेकोट खासगी सुरक्षा व्यवस्थेत तुळजापूरात एका हॉटेलमध्ये आणण्यात आल्याची माहिती आहे. तुळजापूरातूनच हे सर्व सदस्य धाराशिवसाठी रवाना होणार असून एक मोठी बस व काही चारचाकी गाड्यांचा ताफा या सदस्यांसोबत असणार आहे.
त्यामुळे सत्ता स्थापन होईपर्यंत कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.








