मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरानजीक असलेल्या हातलादेवी तलावात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला असून यामुळे परिसरात खळबळ पसरली आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धाराशिव बार्शी रोड वरून जाणाऱ्या काही नागरिकांना हातलादेवी तलावात काहीतरी तरंगत असल्याचे दिसून आले.
र
स्त्यापासून शंभर ते दीडशे फूट पाण्यामध्ये एका व्यक्तीचा फक्त चेहऱ्याचा भाग पाण्याच्या वरती तरंगत असल्याचे काही लोकांना दिसले. नागरिकांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली. प्रथमदर्शनी पाण्यात बुडून मृत्यू झालेला एक व्यक्ती पाण्यात तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले.
ही बातमी समजल्यानंतर हातलादेवी तलावाजवळ नागरिकांची मोठी गर्दी झाली. पोलिसांना कळवल्यानंतर सध्या पोलीस हातलादेवी तलावाजवळ त्या मृतदेहाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रथमदर्शनी हा मृतदेह एका पुरुषाचा असून त्याचे वय अंदाजे 50 असण्याची शक्यता आहे. मृतदेहाच्या परिस्थितीवरून हा मृतदेह किमान दोन दिवस पाण्यात राहिला असण्याची शक्यता आहे. मृतदेहाचा चेहरा ओळखणेही कठीण असल्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. ही आत्महत्या आहे की घातपात आहे याचाही शोध घ्यावा लागणार आहे. सध्या हातलादेवी परिसरामध्ये मोठी गर्दी झाली असून पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
दरम्यान,तलावाच्या बाहेर संबधित व्यक्तीचे कपडे, चप्पल, डायरी साहित्य आढळून आले आहे.त्यामुळे ही व्यक्ती तलावात पोहण्यासाठी गेलेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.मात्र नेमकं कारण पोलिस तपासात समोर येईल.