आरंभ मराठी / येरमाळा
वाशी तालुक्यातील चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुण – तरुणीचा सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी (दि.२२) सहा वाजण्याच्या सुमारास रत्नापूर पाटीजवळील वळणावर घडली. टोलवेच्या कमानीला भरधाव कार धडकून हा अपघात झाला.
वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) आणि इजोरा येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय २३, सध्या मुक्काम वाशी) यांचा गेल्या रविवारी (दि. १५) मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर अवघ्या चार दिवसांतच या नव्या नात्यावर काळाने घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत अक्षया हिला रविवारी लातूर येथे महापारेषणची परीक्षा होती. त्यासाठी ती आणि अक्षय हे दोघे पहाटे वाशी येथून टाटा नेक्सॉन (क्र. एमएच २५ बीएफ ५०६४) या कारमधून लातूरकडे निघाले होते. रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीला जोरात धडकली.
धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरडला गेला. या भीषण अपघातात अक्षया सुनील चव्हाण आणि अक्षय रामभाऊ शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचा चालक अक्षय यादव सिरसट (वय २२) हा गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच रत्नापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.
चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या या तरुण जोडप्याच्या अकाली मृत्यूमुळे वाशी तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.






