आरंभ मराठी / धाराशिव
सध्याच्या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे पीक वाहून गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचे हात पुढे येत आहेत.आणखी मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज व्यक्त होत आहे.
धाराशिव शहरातील भाई उद्धवराव पाटील शिक्षक सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे.
शिक्षक पतसंस्थेच्या धर्मादाय निधीतून तब्बल ₹२,५१,०००/- इतकी मदत शेतकऱ्यांसाठी देण्यात आली असून, हा धनादेश जिल्हाधिकारी यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
जिल्ह्यातील पहिली पतसंस्था म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याचा मान या संस्थेला मिळाला आहे. या उपक्रमामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, समाजाप्रती जबाबदारीची जाणीव दाखवणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
या पतसंस्थेने आजपर्यत कोरोना लॅब, शासकीय रुग्णालय साहित्य, वृक्षारोपण व संवर्धन,भुकंप, पूर अशा सामाजिक कार्यात नेहमी मदत केली आहे. पारदर्शक कारभारामुळे पतसंस्थेला शासनाचा सहकार निष्ठ व सहकार भूषण पुरस्कार मिळाला आहे. या निर्णयाबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष विशाल घोगरे, उपाध्यक्ष शशिकांत पडवळ, सचिव अमरसिंह देशमुख व संचालक मंडळाचे कौतुक केले जात आहे.
संस्थेच्या या पावलामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, इतर सामाजिक संस्था व संघटनांनी देखील अशाच पद्धतीने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.