आरंभ मराठी / धाराशिव
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करत राज्य सरकारने अर्थसंकल्प 2026 मध्ये कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” सुरू करण्याची घोषणा केली.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला होता.
विरोधी पक्षांकडून सरकारवर कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात होता. तसेच नागपूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यानंतर सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासाठी मुदत मागितली होती. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे.
या योजनेत केवळ थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत दिली जाणार नाही, तर जे शेतकरी कर्ज घेऊन नियमितपणे कर्जफेड करतात त्यांनाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल, असा सरकारचा दावा आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे २४ लाख ७३ हजार शेतकऱ्यांकडे तब्बल ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थकबाकी जवळपास साडेपाचशे कोटी रुपये असण्याचा प्राथमिक अंदाज शासनाकडे प्राप्त झाला आहे.
शेतकरी वारंवार कर्जबाजारी होऊ नयेत आणि त्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. या समितीच्या शिफारशींनुसार भविष्यातील धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून राज्यातील बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








