प्रतिनिधी / धाराशिव
देवेंद्र फडणवीस व भाजपची विरोधी पक्षात असताना परिक्षा फीबाबत वेगळी भुमिका असायची पण सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर विरोधी वक्तव्ये करुन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली अशी टीका खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली. धाराशिव फाऊंडेशन व शिवसेनेच्या ठाकरे गटाकडुन रविवारी शहरात रोजगार मेळावा घेण्यात आला, यावेळी खासदार ओमराजे बोलत होते.
जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी शिवसेनेच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवात महाराष्ट्रातील 35 कंपन्यांमार्फत बेरोजगार युवक, युवतीची पात्रतेनुसार निवड करण्यात आली.यात नऊशे तीस उमेदवारांना त्याच ठिकाणी नोकरीचा लाभ दिल्याने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. काही उमेदवारांना नोकरी मिळाली नसली तरी त्यांना जॉब कार्डचे वितरण करण्यात आले.उद्या सोमवारी कळंब शहरात रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.
यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती,त्यात 5 हजार 218 उमेदवारांनी नोंद केली होती. त्यामध्ये काही ऑफलाईन असलेले उमेदवारही आले असुन त्यानाही जॉब कार्ड देण्यात आले आहेत. जॉब कार्डमुळे त्या विद्यार्थ्यांना कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पदाची कोणत्या कंपनीतील जाहीरातीची माहिती संदेशाद्वारे मोबाईलवर मिळणार आहे. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालय येथे पार पडला.
यावेळी राजेनिंबाळकर म्हणाले की, बेरोजगार युवकाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, नोकरीसाठी पात्रता थोडी पण त्याहुन कितीतरी अधिक शिकलेल्या मुले नोकरी मिळविण्याच्या रांगेत पाहयला मिळत आहे. त्यात सरकार युवकांची परिक्षा फी व प्रक्रियेवरुन एकप्रकारे थट्टा करीत असल्याची टिकाही त्यांनी केली.
यांनी तलाठी परिक्षा फी 1 हजार रुपये केली आहे. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंठीवार 600 रुपये फि असल्याच्या कारणावरुन सभागृहात पोटतिडकीने विद्यार्थ्यांची बाजु घेत होते. पण सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर भाजपच्या राज्याचे प्रमुख नेते 1 हजार रुपये फि केल्याचे समर्थन करत आहेत. शिवाय सभागृहात बोलताना त्यानी विद्यार्थी खाजगी कोचींगसाठी 50 हजार रुपये फि भरत असल्याचे विधान केले.
एमआयडीसीमध्ये उद्योगासाठी प्रयत्न करणार-आमदार कैलास पाटील
आमदार कैलास पाटील म्हणाले, सरकारी नोकरी कमी होत आहेत. सरकार सगळ्याच विभागामध्ये खाजगीकरणाचा घाट घालत आहे. त्यामुळे आता आपणही खाजगी कंपनीच्या नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढील काळात शहरासह जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहु, कंपन्या आल्यास निश्चितपणे रोजगार मिळविण्याचा मार्ग मोकळा मिळेल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात कृषी आधारीत उद्योग येण्यासाठी मोठ्या सवलती दिल्या आहेत, त्यामुळे भविष्यात अशा कंपन्याही येथे याव्यात यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी युवासेना सचिव अक्षय ढोबळे ,युवती सेना सचिव मनीषाताई वाघमारे ,तालुकाप्रमुख सतीश सोमाणी ,विकास मोळवणे,शहरप्रमुख सोमनाथ गुरव तसेच शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.