–गजानन जाधव, ता. रोहा, जि. रायगड
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका. मूळचा लातूरचा मी शिक्षक होऊन २००६ मध्ये प्रथमच रोह्याला आलो. तेव्हापासूनच आदिवासी मुलामुलींच्या संपर्कात आलो. हा लेख या मुलांना शिकवण्याच्या माझ्या अनुभवांविषयी.
गेली काही वर्ष मी रायगड जिल्हा परिषद शाळा चिंचवलीतर्फे चालवल्या जाणाऱ्या आतोणे या शाळेत मुख्याध्यापक आहे. आतोणे, रोहा मुख्यालयापासून अतिदुर्गम क्षेत्रात 22 किमी अंतरावर वसलेली ही आदिवासीवाडी. शहरीकरणापासून दूर असलेली. त्यामुळे अनेक गरजा या परिसरातूनच व जंगलातून भागवणारा इथला कातकरी आदिवासी समुदाय. शाळेत इयत्ता 1 ली ते 6 वीचे वर्ग. त्यात पटसंख्या 99. त्यामध्ये 97 विद्यार्थी कातकरी आदिवासी बोलीभाषिक. स्थानिक परिस्थिती पाहता रोजगाराची संधी खूपच कमी. त्यामुळे रोजगाराच्या शोधत स्थलांतर करणे हाच एकमेव मार्ग. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावणं, त्यांना शाळेत टिकवणे व शिकवणे, यासाठी वेगवेगळ्या स्तरावर कसरत करावी लागते. त्यात प्रत्येक मुलं शाळेत कसे रमेल यासाठी विविध उपक्रमांचा आधार घेऊन शाळेत टिकवणे हेच प्रथम प्राधान्य असते.
आदिवासी मुलांना चार भिंतीबाहेरील शाळा खूप आवडते. पुस्तकी ज्ञानापेक्षा ते निसर्गात रमतात. ज्या गोष्टी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ज्ञात नसतात त्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा हातखंडा असतो. मुलांना शाळेत टिकवायचं असेल,रमवायचं असेल तर त्यांच्या आवडीप्रमाणे जर शिक्षण दिलं तर त्यांना शाळा आवडते. शाळा आवडली तर मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील. यासाठी त्यांच्या सुप्तगुणांना संधी द्यावी लागते, हे मी या मुलांसोबत राहून शिकलो.
शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. रानावनात राहणारा त्याच वातावरणात रमणारा हा आदिवासी समुदाय आणि त्यांच्या सहवासात राहणाऱ्या त्यांच्या मुलांवर परिसरातील अनेक सकारात्मक बाबींचा प्रभाव पडतो.जंगली रानभाज्या असो की औषधी वनस्पती, कलात्मकता असो की कार्यकुशलता याचा प्रभाव मुलांवर पडतो. याचा उपयोग शिक्षणात झाला तर भविष्यात व्यवसायिक शिक्षणाचा पाया रोवला जाईल.अशा कार्यनुभव विषयातील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होऊन पालकांसोबत होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्थलांतराला काही प्रमाणात चाप बसेल. यातून आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील.
प्रत्येक मुलं हे त्याच्या गतीने शिकत असते.त्याच्या शिकण्यावर कुटुंब,परिसर आणि तिथल्या परिस्थितीचा प्रभाव पडत असतो. शिक्षण म्हणजे लिहतावाचता येईल इतपत मर्यादित न ठेवता त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल? या नजरेतून पाहिलं तर उत्तम होईल. भाषा,गणित, इंग्रजी हे विषय जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हेही महत्त्वाचे आहेत.
गेल्या 17 वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील कातकरी मुलांना शिकवण्याचे काम करत आहे. 17 वर्षात त्यांच्या शिकण्याची गती, पद्धत व त्यांच्या शिक्षणावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो ते पाहिलं आहे. औपचारिक शिक्षणाची सुरवात ही प्रमाण मराठी भाषेत होते आणि इथूनच या मुलांच्या शिक्षणाचा प्रवास सुरु होतो.ज्या मुलांची बोली ही माध्यम भाषेपेक्षा वेगळी आहे त्यावेळी त्यांना माध्यम भाषेशी जुळवून घ्यायला वेळ लागतो व थोडं अवघड वाटतं. वयाच्या 6 व्या वर्षापर्यंत कुटुंबात,परिसरात कातकरी बोलणारी मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा प्रथमच त्यांना शिक्षकांकडून मराठी भाषेची ओळख होते. पण लहानग्या वयात एकदम मराठी भाषा त्यांना अवघड जाते व स्वभाषेतून शिक्षण असावे त्याना मनोमन वाटते.हाच धागा पकडून त्यांना बोलीभाषेतून शिक्षण देण्याचा प्रयोग केला.
बोलीभाषेतून शिक्षण:- शाळेत पहिल्या वर्गात येणाऱ्या कातकरी बोलीभाषिक मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या भाषेत शिक्षण मिळावे,यासाठी त्यांच्याशी कातकरी बोलीभाषेत संवाद सुरू केला. अनेक वर्षे कातकरी बोलीभाषिक मुलांमध्ये राहून कातकरी भाषेचे ज्ञान झाले होते. त्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणात करायचा ठरवला. मुलांशी कातकरी भाषेतल्या अनौपचारिक गप्पांच्या माध्यमातून भावनिक नाते निर्माण केले. सुरवातीच्या टप्प्यात मुलांशी मनमोकळा संवाद साधला. जसे, कातकरी मध्ये- तुना नाव काय आहा?(तुझं नाव काय आहे), तू आंगलास का?(तू आंघोळ केला का) अशी छोटी छोटी वाक्यं कातकरीमध्ये बोलून त्यांना बोलतं करायचं.
त्यानंतर त्यांच्या बोलीभाषेत गोष्टी सांगायला सुरुवात केली. बडबडगीते शिकवली. मग पाठ्यक्रमातील कविता आधी कातकरी बोलीत मुलांना ऐकवायच्या व नंतर मराठीमध्ये. यामुळे स्वभाषेत त्यांना त्याचा अर्थबोध व्हायचा.असा प्रयोग अनेकवर्षं केला. त्यानंतर मुळाक्षरे पण त्यांच्याच भाषेत शिकवायला सुरवात केली. जसे,
क- कमळऐवजी कुकडा(कोंबडा)कुकडी(कोंबडी)
ख- खटाराऐवजी खुबे(गोगलगाय)
ग – गवतऐवजी गोड(गुळ)
अशी वर्णमाला बनवली व त्यातून त्यांना मुळाक्षरे शिकवायला सुरवात केली. जसं वय वाढतं तशी बौद्धिक परिपक्वता येत असते. कातकरी बोलीभाषिक मुलांची भाषेच्या बाबतीत शिकण्याची गती सावकाश असते पण मुलांना आवड निर्माण झाली की ते सहज शिकतात.
त्यांच्या शिकण्यात अनेक अडथळे आहेत घरचे वातावरण,अनास्था,स्थलांतर अशा खडतर परिस्थितीत ही मुलं शिक्षण घेत आहेत. विशेषतः मुलींना शिक्षणाची अधिक आवड असल्याचे जाणवते.
जशी इयत्ता वाढत राहते तशी मुलांची प्रगती जाणवायला लागते. भाषेत पहिलीदुसरीत अक्षर ओळखीला झगडणारी मुलं तिसरीचौथी मध्ये गेल्यावर वाचनाचा सूर पकडू लागतात. त्यात त्यांच्या विशिष्ट गतीत व आरोहअवरोहमध्ये ती वाचू लागतात. वाचनात त्यांच्या बोलीभाषेचा हेल जाणवत असतो. इतर मुलांच्या तुलनेत जरी कातकरी बोलीभाषिक मुलांची भाषा विषयात प्रगती कमी गतीने असली तरी वरच्या वर्गात गेल्यास ते समजून वाचन व लेखन करायला शिकतात.पण या मुलांना वेळ देणे खूप गरजेचे असते.