धाराशिव शहरालगतचा निसर्गसुंदर परिसर बनतोय कचऱ्याचा डेपो; पालिकेच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचे ढीग साचले, मृत जनावरे, डुकरांच्या त्रासाने दुर्गंधी, निर्माण होत आहेत आरोग्याच्या समस्या
■ आरंभ मराठी विशेष ■ प्रणिता राठोड
धाराशिव शहरालगत निसर्गरम्य वातावरणात वाढत असलेल्या साईराम नगर परिसराचा श्वास आता कोंडू लागला आहे. परिसरात साचलेला कचरा आणि त्यातून निर्माण होत असलेली दुर्गंधी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हा परिसर जणू आता कचऱ्याचे डम्पिंग यार्ड बनत आहे. या कचऱ्यात पावसाचे पाणी साचून त्यातून उग्र दर्प येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. कचऱ्यात अविघटनशील विषारी वस्तूंचा समावेश आहे, शिवाय माशा व डासांची उत्पत्ती होत असून, भटक्या जनावरांचाही वावर वाढलाय.
धाराशिव शहरातील साई रामनगरमधील खुल्या परिसरात सध्या कचऱ्याचे डोंगरच तयार होत आहेत. कचऱ्यात कपडे,प्लास्टिक,चामडी आदींचा समावेश आहे. अशातच अज्ञात व्यक्तीकडून कचऱ्याला आग लावली जाते. या आगीमुळे कचऱ्यातून निघणारा हा विषारी धूर परिसरामध्ये पसरतो. परिणामी परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच पावसाचे पाणी कचऱ्यात साचत असून, या कचऱ्यातून दुर्गंधी निर्माण होते. यामुळे साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. सकाळी हातलादेवी परिसरात फिरायला जाणाऱ्या नागरिकांना व मुलांनाही याचा त्रास होत आहे. हातलादेवी परिसर हा शहराला लाभलेला नैसर्गिक वारसा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणाऱ्या या वाटेवर वाढत जाणारे हे कचऱ्याचे डोंगर नैसर्गिक सुंदरतेला गालबोट लावत आहेत.शिवाय या कचऱ्यामुळे डुकरे व भटक्या कुत्र्यांचाही वावर परिसरात जास्त प्रमाणात वाढला आहे. नगर परिषदेकडून याची दखल घेण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली.
नागरिकांचा पालिकेविरुद्ध संताप
कचऱ्यातील या दुर्गंधीमुळे साईराम नगर परिसरातील नगरवासी चांगलेच संतापले आहेत. यामुळे आरोग्याच्या धोका निर्माण होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. या विषारी दुर्गंधीमुळे श्वास घेणे सुद्धा कठीण आहे. एकीकडे स्वच्छ शहरासाठी कचरा विलगीकरणाचीची संकल्पना राबवली जात असल्याचे सांगण्यात येते. स्वच्छता कंत्राटदारासोबत करार केल्यानंतर त्यामध्ये घनकचरा विलगीकरण आणि दैनिक कचऱ्याची रोज विल्हेवाट लावण्याचे नमूद केले जाते. मात्र त्यानंतर करारातील अटींचे पालन होताना दिसत नाही. जागा मिळेल तिथे कचरा टाकला जात आहे. यामुळे डेंग्यू व हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत.
घंटागाड्याचे नियोजन कोलमडले, म्हणून नागरिक टाकतात कचरा
कचरा विलगीकरण तर दूर तांत्रिक निर्देशाचेही येथे पालन केले जात नाही. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही तोडगा काढला जात नाही. घंटा गाड्यांची यंत्रणा ठप्प झाली आहे.काही भागात 15-15 दिवस घंटागाडी येत नाही. परिणामी दररोजच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे कचरा परिसरातील मोकळ्या जागेत टाकला जातो. साईराम नगर परिसरात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिषदेकडूनच माशा व डासांची उत्पत्ती होण्यासाठी हातभार लावला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला. तसेच या गंभीर समस्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.