सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर:
तुळजापूर शहरातील ड्रग्स प्रकरणात अजून एक आरोपी निष्पन्न झाला असून, त्याला तुळजापूर येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली असून, त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत आरोपींची संख्या सातवर पोहचली आहे.
तुळजापूर येथे विक्रीसाठी येत असलेले ड्रग्स तामलवाडीजवळ पकडण्यात आले होते. त्यामुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा,यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना 72 तासांचा अल्टिमेटम दिला होता.
तिर्थक्षेत्र तुळजापूरात गेल्या अडीच वर्षापासून हे रॅकेट सुरु असल्याचे बोलले जात होते.
दरम्यान शहरातील नागरिकांनी याबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली होती. पालकमंत्र्यांनी याबाबत पोलिसांना ७२ तासात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. पालकमंत्री यांच्या आदेशानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून, या प्रकरणामध्ये कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
या प्रकरणात सुरुवातीला 3 आरोपी निष्पन्न झाल्यावर तुळजापूर येथील एक व मुंबई येथील महिलेला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरु करण्यात आली होती. ‘आरंभ मराठी’ला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील संतोष खोत यास तुळजापूर येथून पोलिसांनी अटक केली असून,आरोपीची कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींची संख्या सात झाली असून, या प्रकरणी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.