प्रतिनिधी / मुंबई
राजकारणाची विश्वासार्हता, जबाबदारी, नैतिक मूल्य या सगळ्यांविषयी मतदारांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत असून,आपला आतील आवाज साहेबांसोबतच राहावं म्हणतोय, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबतच राहणार, असे स्पष्ट केले आहे. तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडत एक गट सोबत घेऊन भाजपला साथ देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा देखील समावेश होता. त्यामुळे ते अजित पवार यांच्या सोबत असल्याच्या चर्चा होत होत्या. पण अमोल कोल्हे यांनी ते शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ‘सगळं विसरायचं पण बाप नाही विसरायचा’ असे म्हटले आहे. पण यानंतर आत्ता त्यांनी खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचे जाहीर केले आहे.
डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केले, ते एका विचारधारेवर,विश्वास ठेऊन केले असल्याने मतदारांचा विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार आहे. कोल्हे म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेद्वारे इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला नैतिक मुल्यांसोबत राहणे जास्त योग्य वाटते हे राजकारण पाहता मी खासदारकीचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार आहे.