आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील बेंबळी परिसरातील गावातील एका तरुणाने ३२ वर्षीय विवाहित महिलेच्या अंघोळ करतानाच्या छायाचित्रांचा गैरवापर करून ती छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर घटना दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी अंदाजे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडिता घरी एकटी असताना गावातील एका तरुणाने तिच्या घरी येऊन, तिच्या अंघोळीचे छायाचित्रण केल्याचे सांगत ती छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकीच्या आधारे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या घटनेबाबत पीडित महिलेने १२ नोव्हेंबर २०२५ रोजी बेंबळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तिच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६(१), ३५१(२)(३), ३२२ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(२)(व्ही) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या ओळखीतील असून सध्या फरार आहे. बेंबळी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. घटनेचा पुढील तपास बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.








