आरंभ मराठी / प्रतिनिधी
धाराशिव : सप्टेंबर महिन्यात विशेषतः मागील चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले असून प्राथमिक आकडेवारीनुसार सव्वादोन लाख हेक्टरवरील पिके व फळबागांचा पूर्णतः नाश झाला आहे. यामध्ये तब्बल ३६३ गावे बाधित झाली आहेत. तसेच एक लाख ९८ हजार ३७५ शेतकरी या आपत्तीने होरपळून निघाले आहेत.
अतिवृष्टीमुळे एक हजार ४८ घरांची पडझड झाली असून, अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. यासोबतच २०७ जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्राथमिक आकडेवारीनुसार २ लाख २६ हजार ७०६ हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. यात जिरायती, बागायती तसेच फळपिके यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले की, नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने युद्धपातळीवर सुरु केले आहेत. ऑगस्ट महिन्यात शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाच्या याद्या तयार करून वाटपाची प्रक्रिया गतीने सुरु आहे. पंचनाम्यानंतर नव्याने झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मागणी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आकडेवारीनुसार दोन लाख दोन हजार ८३९ हेक्टरवरील जिरायती, २१ हजार ४४२ हेक्टरवरील बागायती व दोन हजार ४२५ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व पिकांचे अंदाजे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून सर्वाधिक फटका परंडा तालुक्याला बसला आहे. सर्वात कमी नुकसान कळंब तालुक्यात नोंदवले गेले आहे.
जनावरांचे मोठे नुकसान
अतिवृष्टीत केवळ शेतीच नव्हे तर जनावरांचाही मोठा बळी गेला आहे. १६५ दुधाळ जनावरे, ३६ लहान जनावरे आणि सहा ओढकामाची जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्याही पुनर्वसनाची मागणी होत आहे.
घरांची पडझड, रस्ते वाहून गेले
अतिवृष्टीमुळे १०३७ कच्च्या घरांची पडझड झाली आहे. त्यापैकी सात घरे पूर्णतः कोसळली असून चार गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेलाही फटका बसला असून १५ तलाव फुटले, १२ रस्ते व तीन पुलांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरु करून १६ गावांचा संपर्क पुन्हा प्रस्थापित केला आहे.
बचाव कार्यातून ४९८ नागरिकांची सुटका
पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर, महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांनी शोध व बचाव मोहिम राबवली. यातून ४९८ नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
सद्यस्थितीत परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असली तरी अजूनही मोठ्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने पुढील काळातील धोका लक्षात घेऊन तयारी ठेवली आहे.