दीड महिन्यात १५ लाख पाण्यात ; वाघ अजूनही भटकतोय वनात
शेळ्या, वासरे आणि जनावरांची शिकार नेमकी केली कोणी?
आरंभ मराठी / धाराशिव
यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्यातून आलेला साडेतीन वर्षांचा वाघ धाराशिवमध्ये दाखल होऊन तीन महिने झाले. वाघाला पकडण्यासाठी पहिल्या टप्प्यात दिलेली मुदत संपली असून, मागील दीड महिन्यात या वाघाला पकडण्यासाठी १५ लाखांचा खर्च झाला आहे.
दिलेल्या मुदतीत वाघ सापडला नसल्यामुळे आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या वाघाला पकडण्यासाठी दररोज ३५ हजार रुपये खर्च होत आहेत. हा खर्च पाहता वनविभागाकडून वाघाला पकडण्यासाठी मुद्दाम उशीर केला जात आहे का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
धाराशिव जिल्ह्यात तीन महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेल्या टिपेश्वर येथून आलेल्या वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. येडशी येथील पाणवठ्यावरील ट्रॅप कॅमेऱ्यात १९ डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदाच या वाघाचे छायाचित्र कैद झाले होते. त्यानंतर वनविभागाने २४ डिसेंबर रोजी वाघाला पकडण्याची परवानगी मागितली होती.
मुख्य वन संरक्षक यांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परवानगी दिल्यानंतर १४ जानेवारी पासून प्रत्यक्ष वाघ पकडण्याची मोहीम सुरू झाली. सुरुवातीला ताडोबा येथील दहा जणांच्या टीमने आठ दिवस वाघ पकडण्याचे प्रयत्न केले. आठ दिवसात ताडोबा येथील रेस्क्यू टीमवर इंधन, जेवण आणि इतर खर्च असा जवळपास अडीच लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु, आठ दिवस प्रयत्न करूनही त्यांच्या हाती वाघ लागला नाही.
त्यानंतर पुणे येथील आठ जणांच्या रेस्क्यू टीमला वाघ पकडण्यासाठी पाचारण करण्यात आले. २४ जानेवारी पासून पुण्याच्या टीमने वाघ पकडण्याची मोहीम सुरू केली. या टीमला सुरुवातीच्या दोन आठवड्यात विशेष काही करता आले नाही. या रेस्क्यू टीमवर ३५ दिवसात जवळपास १२ लाख रुपये खर्च झाला आहे.
या दरम्यान वाघाला ट्रॅप करण्यासाठी शेळी, बोकड आणि वासरे मुबलक प्रमाणात रामलिंग अभयारण्यात येत होत्या. त्या नेमक्या वाघाने फस्त केल्या की इतर कोणी याबद्दल उघड उघड शंका व्यक्त केली जात आहे. पुण्याच्या टीमने दोन वेळा डार्ट गनच्या सहाय्याने वाघाला पकडण्याचे प्रयत्न केले. परंतु, वाघाने चकवा दिला. मुख्य वनसंरक्षक यांनी २८ फेब्रुवारी पर्यंत वाघाला पकडण्याची मुदत दिली होती. या काळात वाघाने जवळपास ६० जनावरे फस्त केली. परंतु, वनविभागाला वाघ सापडला नाही.
पहिल्या टप्प्यात १५ लाखांचा खर्च –
वाघ पकडण्याची पहिल्या टप्प्यातील मोहीम १४ जानेवारी ते २८ फेब्रुवारी अशी ४६ दिवस चालली. या प्रत्येक दिवसाचा खर्च ३५ हजारांच्या आसपास झाला आहे. रेस्क्यू टीमला दिलेल्या गाड्या, त्यांचे इंधन रेस्क्यू टीमचे दररोजचे जेवण यावर हा खर्च झाला आहे. रेस्क्यू टीममधील आठ लोक आणि वनविभागाचे इतर जवळपास तीस ते चाळीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. आतापर्यंत तब्बल १५ लाख रुपये खर्च करूनही वाघ अजूनही सैरभैर फिरत आहे.
दोन महिन्यांची मिळाली मुदतवाढ –
वाघाला पकडण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत अजून दोन महिने मुदतवाढ मिळाली आहे. या मुदतीत तरी वाघ सापडतो का? यावर शंका उपस्थित केली जात आहे. सध्या दररोजचा खर्च ३५ हजारांच्या आसपास होत आहे. इतका खर्च करूनही वनविभागाला वाघ सापडत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून वनविभागावर शंका घेतली जात आहे.
शिकारीसाठी आणलेल्या जनावरांची मोजदाद नाही –
वाघाला रामलिंग अभयारण्यात ट्रॅप करण्यासाठी काही जनावरे आणली जातात. यामध्ये छोटी वासरे, शेळ्या, बोकड यांचा समावेश असतो. मागील दीड महिन्यात अशी किती जनावरे आणली गेली याची माहिती देण्यास अधिकाऱ्यांकडून नकार दिला जात आहे. शिवाय या जनावरांवर केलेला खर्च किती? याचीही माहिती वनविभागाकडून सांगितली जात नाही. त्यामुळे वाघासाठी आणलेल्या जनावरांची शिकार नेमकी कोणी केली याबद्दल शंका उपस्थित होत आहे.
वाघाने ६० पेक्षा अधिक जनावरांचा पाडला फडशा –
आतापर्यंत या वाघाने धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे. त्याबदल्यात शेतकऱ्यांना वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. तो देखील वेगळा खर्च वाघामुळे होत आहे. ६० जनावरांच्या नुकसानीची रक्कम लाखो रुपये होते. रामलिंग अभयारण्या शेजारील पशु पालकांच्या मनात वाघामुळे दहशत निर्माण झाली असून स्वतःसह जनावरांचा जीव वाचवण्याचे दिव्य शेतकऱ्यांना पार पाडावे लागत आहे.
वाघ नेमका सापडणार कधी ?
वाघ नेमका सापडणार कधी याबद्दल वन अधिकाऱ्यांचे एकच उत्तर ठरलेले आहे ते म्हणजे लवकरच. सध्या हा वाघ धाराशिव, वाशी, भूम, बार्शी आणि तुळजापूर असे पाच तालुके फिरून आला आहे. वन विभागाने रामलिंग अभयारण्यात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याकडे वाघ फिरकत देखील नाही.
सध्या हा वाघ बार्शी तालुक्यातील वडजी शिवारात असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. वडजी शिवारात रेस्क्यू टीमने मागील चार दिवसांपासून वाघाला पकडण्याची तयारी केली असून, तयारी केलेल्या ठिकाणी वाघ फिरकतही नसल्यामुळे रेस्क्यू टीम हातावर हात देऊन बसली आहे. वाघ दिसल्याची बातमी मिळाल्यावर वनविभागाचे पथक तिथे पोहोचेपर्यंत वाघ दुसरीकडे गेलेला असतो. वाघ पुढे आणि रेस्क्यू टीम मागे हा खेळ दीड महिना झाले सुरू आहे. दिवसेंदिवस मोहिमेचा खर्च वाढत असून, वनविभागाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे.