आरंभ मराठी / तुळजापूर
नवरात्र महोत्सवात लूटमार करणाऱ्या सहा जणांच्या टोळीच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. या टोळीकडून हत्यारे आणि दरोडा टाकण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले. मागील चार दिवसात पोलिसांनी दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, तुळजापूर येथे तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुरुवारी (दि.२५) पेट्रोलींग सुरू होती.
त्यावेळी सपोनि कासार यांना तुळजापूर ते लातूर बायपास रोडजवळ पाच ते सहा इसम झाडी व गवताचा आडोशाला लपून तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकांना अडवून लुटत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली.
पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता सहा व्यक्ती लपून आडोशाला बसलेले दिसले. पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर छापा घातला असता त्यांच्याकडे एक लोखंडी कत्ती, एक लोखंडी सुरा, मिरची पावडर ची पुडी असा मुद्देमाल मिळून आला.
त्यामुळे ही टोळी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पंचनामा करून त्यांच्या जवळील मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सहा जणांवर दरोड्याचा प्रयत्न करत असल्याचा गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला.
आरोपींवर गुरन 358/25 क 310(4),310(5) भान्यास सह क 4,25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलीस अधिक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह- शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चापोअं- रत्नदीप डोंगरे, नवनाथ गुरव यांच्या पथकाने केली.