आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या बायो डिझेलची विक्री सुरु असून, बायो डिझेलचा धंदा चांगलाच फोफावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
त्यामुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे. रविवारी (दि.११) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनी बायो डिझेलची विक्री करण्यासाठी आलेला 407 टँम्पो (क्र – एमएच.03 सीपी 4396) पकडून ठेवला आहे.
यामध्ये भेसळ केलेले तीन हजार लिटर डिझेल आढळून आले आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी पोलिसांना व तहसीलदार तुळजापूर यांना निवेदन दिले असून यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
सध्या उन्हाळा सुरू असून पावसाळा तोंडावर असल्याने शेतातील मशागतीची कामे उरकण्यावर शेतकरी बांधव भर देत आहेत. मात्र, दुसरीकडे डिझेलच्या भेसळीमुळे टॅक्टरमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे.
दिंडेगाव येथे पोलिसांच्या व पुरवठा विभागाच्या नाकावर टिच्चून अवैध डिझेल विक्री सुरू आहे. महसूल व पोलिस विभागाच्या दुर्लक्षामुळे सर्रास विक्री सुरू झाली आहे. वरकमाईमुळे कर्तव्यही खुंटीला टांगल्याचे चित्र आहे.
अवैध बायोडिझेल विक्रीचा विषय तालुक्यात चर्चेत असताना संबंधित अधिकारी कारवाई का करीत नाहीत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. डिझेल भेसळ करणारे दुसरे तिसरे कोणी नसून धाराशिव येथील एक महिला पोलीस कर्मचारी असल्याची चर्चा सुरू आहे. नारायण हालगुंडे व सूरज बचाटे यांनी तुळजापूरच्या तहसीलदार यांना निवेदन दिले असून पकडलेल्या डिझेलची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.