आरंभ मराठी / धाराशिव
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बावी पाटीजवळ हॉटेल भाग्यश्री समोर आज सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३२ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच टेम्पो चालकालाही डोक्याला मार लागला आहे.
जखमी विद्यार्थी निवासी मूकबधिर विद्यालय, उमरगा येथील असल्याची माहिती मिळाली आहे. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिरासाठी हे विद्यार्थी येत असताना हा अपघात घडला. आयशर टेम्पोमध्ये एकूण ३५ विद्यार्थी, एक शिक्षक आणि चालक प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, मागून आलेल्या एका कारने टेम्पोला अचानक कट मारल्याने टेम्पोचा तोल गेला.
त्याच वेळी टेम्पोच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या मोठ्या कंटेनरला टेम्पो धडकला. या धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला. या अपघातात सहा विद्यार्थ्यांना तुलनेने जास्त मार लागल्याचे जखमी शिक्षक कालिदास भगवान लोकरे यांनी सांगितले. जखमी विद्यार्थ्यांमध्ये गणेश लिंबोळे या विद्यार्थ्याचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे.
नोमान शेख या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मेंदूला मार लागल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि सर्व जखमी विद्यार्थ्यांना धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन विद्यार्थी आणि एक चालक यांना गंभीर स्वरूपाचा मार लागला असून त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती असून उपचारानंतर त्यांना आज दुपारपर्यंत घरी सोडण्यात येणार आहे. सध्या सर्व जखमींवर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत.









