वाढीव सहा दिवसांच्या मुदतीत फक्त तीन हजार शेतकऱ्यांची खरेदी
आरंभ मराठी / धाराशिव
सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा आज (दि.६) शेवटचा दिवस असून, धाराशिव जिल्ह्यातील तब्बल २२ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी ३१ जानेवारी हा खरेदी करण्याचा शेवटचा दिवस होता. राज्य सरकारने सहा दिवसांची मुदतवाढ देऊनही धाराशिव जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या ३५ हजार ४०० शेतकऱ्यांपैकी तब्बल २२ हजार शेतकऱ्यांचा अजूनही नंबर आलेला नाही.
जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या फक्त ३० टक्के शेतकऱ्यांची खरेदी झाली आहे. खरेदी केंद्रांना मुदत वाढवून द्यावी यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून तुळजापूर येथे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
राज्य सरकारने सोयाबीन पिकाच्या बाजारातील कमी होत जाणाऱ्या किंमती पाहता हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला होता. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे या निर्णयाचा फायदा निवडणुकीत होईल असा अंदाज महायुती सरकारने व्यक्त केला होता. हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा हा निर्णय चांगला होता.
परंतु, त्याची अंमलबजावणी करताना नियोजनाच्या अभावामुळे शासनाच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर तोटा झाला. सुरुवातीला खरेदी केंद्रांची संख्या कमी असणे, बारदाना उपलब्ध नसणे या कारणामुळे गेल्या तीन महिन्यातील ४० दिवस वाया गेले. खरेदी केंद्रांवर पुरेसे मनुष्यबळ नसणे, वाहतूक व्यवस्था नसणे, गोदामात जागा उपलब्ध नसणे या कारणांमुळे खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेने चालू शकली नाहीत.
सुरुवातीला जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत खरेदी करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पुढे ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. त्यांनंतर सहा दिवस मुदतवाढ देऊन ६ फेब्रुवारीपर्यंत खरेदी करण्याचे आदेश दिले. परंतु तरीही आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या केवळ ३० टक्के शेतकऱ्यांचीच खरेदी होऊ शकली. नोंदणी केलेले ७० टक्के शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. धाराशिव जिल्ह्यात २१ खरेदी केंद्रांवर ३५ हजार ४०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी ५ फेब्रुवारी पर्यंत १२ हजार ४९७ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. म्हणजे आणखी २२ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी असताना आज खरेदी केंद्र बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
वाढीव सहा दिवसांच्या मुदतीत केवळ तीन हजार शेतकऱ्यांची खरेदी
३१ जानेवारी रोजी शासनाने सहा दिवसांची मुदतवाढ देऊन ६ फेब्रुवारी पर्यंत खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु या सहा दिवसात २१ खरेदी केंद्रांवर केवळ ३ हजार शेतकऱ्यांचीच खरेदी होऊ शकली.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी करण्यास लागू शकतात तीन महिने
धाराशिव जिल्ह्यात नोंदणी केलेले आणखी २२ हजार शेतकरी प्रतीक्षेत आहेत. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या खरेदी केंद्रात आतापर्यंत केवळ १३ हजार शेतकऱ्यांची खरेदी झाली आहे. म्हणजे राहिलेल्या २२ हजार शेतकऱ्यांची खरेदी होण्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
धाराशिव जिल्ह्यातील आकडेवारी
* नोंदणी केलेले शेतकरी – ३५४०३
* SMS केले – २५१५७
* माल खरेदी केलेले शेतकरी – १२४९७
* प्रतीक्षेत असणारे शेतकरी – २२९०६
शासनाकडून शेतकऱ्यांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक –
राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा लावली आहे. धाराशिव जिल्ह्यातील एकूण उत्पादनापेक्षा केवळ ५ टक्के सोयाबीन खरेदी केले आहे.
राजस्थान राज्यात १४ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मिळते मग महाराष्ट्रात का नाही? इतर शेतकऱ्यांची सोडा किमान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी होईपर्यंत सर्व केंद्र सुरू ठेवायला हवीत. हे सर्व शासकीय यंत्रणेचे अपयश आहे. शेतकऱ्यांची ही क्रूर थट्टा आहे.
कैलास पाटील, आमदार.