आरंभ मराठी / कळंब
मोबाईलवर गेम खेळण्यासाठी हट्ट धरणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीला वडिलांनी प्रतिबंध केल्यानंतर मुलीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कळंब शहरातील डिकसळ परिसरात घडली.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
अलीकडे लहान मुलांचे मोबाईलवर व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तासनतास मोबाईलवर गेम खेळणारे अनेक तरुण आपल्या आसपास सहज पाहण्यास मिळतात. पण मोबाईलचे हे व्यसन एका अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतले आहे.
वडील मोबाईलवर गेम खेळू नको म्हटल्यामुळे एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना कळंब शहरातील डिकसळ परिसरात घडली. जोगेश्वरी निषाद (वय १६, मूळ रा. छत्तीसगड), असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करत असून, पोटाची खळगी भरण्यासाठी ते मध्यप्रदेशमधील छत्तीसगड येथून कळंब शहरात आले.
जोगेश्वरी आपल्या कुटुंबासह कळंब येथील डिकसळ परिसरात वास्तव्यास होती. सोमवारी सायंकाळच्या सुमारास जोगेश्वरीने वडिलांकडे मोबाईलवर गेम खेळण्यासाठी हट्ट केला. मात्र, वडिलांनी नकार दिल्यानंतर ती नाराज झाली.
वडील आपल्यावर रागवल्यामुळे जोगेश्वरीने नैराश्यातून तिने राहत्या घरातील स्लॅबच्या लोखंडी कडीला साडीने गळफास घेतला. काही वेळातच कुटुंबीयांनी तिची अवस्था पाहून आरडाओरड केली.
तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.