आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील केशरी रेशनकार्ड धारक शेतकरी कुटुंबांना धान्य न देता थेट पैसे देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. मात्र, मागील आठ महिन्यांपासून केशरी कार्डधारक लाभार्थ्यांना हे पैसे मिळत नव्हते.
राज्य सरकारने शुक्रवारी (दि.१२) यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला असून, पुढील चार दिवसात हे थकीत पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अनेक दिवसांपासून या रकमेसाठी प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ४७ हजार ७१ कार्डधारक महिलांना याचा थेट लाभ मिळणार आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिन्याला १७० रुपये याप्रमाणे जिल्ह्यातील १ लाख ९८ हजार ४७२ लाभार्थ्यांना ३ कोटी ३७ लाख ४० हजार २४० रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे.
दिनांक १७ सप्टेंबर पासून याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. शेतकरी कुटुंबांना धान्याऐवजी पैसे देण्याची योजना शासनाने सुरू केली. मात्र, मागील आठ महिन्यांपासून शेतकरी कुटुंबांना धान्य आणि पैसे दोन्ही मिळत नव्हते.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, थकीत अनुदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. १७ सप्टेंबर पासून बँकांच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार आहे.
यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती पडताळणी पूर्ण केली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या या मदतीमुळे हजारो केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून उत्सव काळात ही मदत उपयोगी ठरणार आहे.