चुरस वाढणार,इच्छुकांची तयारी सुरू होणार
आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज (दि.५) जाहीर झाली आहे.राज्यातील वेगवेगळ्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या सोडती जाहीर होत असून, जिल्ह्यातील धाराशिव,कळंब, भूम, परंडा नगरपालिकेचे आरक्षणही जाहीर झाले आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे आता इच्छुकांची तयारी सुरू होणार आहे.
जाहीर झालेल्या सोडतीनुसार धारशिवचे नगराध्यक्षपद
ओबीसी महिला गटाला हे आरक्षण सुटले आहे. यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. एकूण ३९ नगरसेवकांच्या जागांपैकी ओबीसी महिला नगराध्यक्ष होणार आहे. आरक्षण निश्चित झाल्यामुळे पक्षांतर्गत गणिते आणि राजकीय समीकरणे नव्याने जुळू लागली आहेत. थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.
मागील पंचवार्षिकमध्ये देखील थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवड करण्यात आली होती. त्रिशंकू झालेल्या लढतीत शिवसेनेच्या मकरंद उर्फ नंदुराजे निंबाळकर यांनी बाजी मारली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या आमदार राणा पाटील यांनी सर्वाधिक जागा जिंकून पालिकेवर वर्चस्व मिळवले होते.
परंतु, नगराध्यक्ष पद विरोधकांना गेल्यामुळे बहुमत असूनही राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले होते. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार राणा पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत असलेल्या बऱ्याच नगरसेवकांनी नंतर भाजपची वाट धरली. मागील साडेचार वर्षांपासून धाराशिव नगरपालिकेवर प्रशासकराज आहे. शहरातील विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
१४० कोटींचे शहरांतर्गत रस्ते, अर्धवट असलेली भुयारी गटार योजना, शहरातील खड्डेमय रस्ते यांमुळे शहरवासीय बेजार झालेले आहेत. सध्या शिवसेना (उबाठा) आणि भाजप या दोन पक्षांमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, राजकीय वातावरण तापलेले आहे.
यंदा परिस्थिती वेगळी आहे, कारण शिवसेना (उबाठा) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे दोन स्वतंत्र गट मैदानात उतरणार असून, भाजप सोबतची लढत चुरशीची होणार आहे. दरम्यान, शिंदे गटाची शिवसेना, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार गट आणि काँग्रेस या चारही पक्षांसमोर अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
धाराशिव शहरात पारंपरिक शिवसेनेचा मजबूत गड असला तरी, भाजपने मागील काही वर्षांत संघटनशक्ती वाढवली असून, तरुण मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.