आरंभ मराठी / धाराशिव
मागील साडेतीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आरक्षण सोडत राज्य सरकारने जाहीर केली असून, धाराशिव जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटाला सुटले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या पुढील अध्यक्षपदी सर्वसाधारण गटातील महिला सदस्याची निवड होणार आहे.
या सोडतीनंतर जिल्हा परिषदेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. प्रमुख पक्षांकडून महिला उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेतील महिला सदस्यांसाठी ही मोठी संधी मानली जात असून, कोणत्या पक्षातून कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांचे देखील आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये अनुसूचित जाती पुरुष १, ओबीसी पुरुष १, ओबीसी महिला १, सर्वसाधारण पुरुष २ आणि सर्वसाधारण महिला ३ अशा प्रकारे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. दिवाळीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
मागील साडेतीन वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित असून, आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यात खरी लढत भाजपा आणि शिवसेना (उबाठा) या दोन पक्षात होण्याची शक्यता आहे.