आरंभ मराठी / धाराशिव
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेले उपोषण आज पाचव्या दिवशी मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे जाहीर केले असल्यामुळे जरांगे पाटील यांनी आज पाचव्या दिवशी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी समितीमधील सर्व सदस्यांना सोबत घेऊन जरांगे पाटील यांच्यासोबत आझाद मैदानात जाऊन सकारात्मक चर्चा केली.
हैदराबाद गॅझेट लागू करणे, सातारा गॅझेट लागू करणे आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे या तिन्ही मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. सातारा- औंध संस्थानचे गॅझेट एक महिन्यात लागू करणे, हैदराबाद संस्थानचे गॅझेट लगेच लागू करणे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे,
आंदोलकांवरील दंड मागे घेणे आणि आत्महत्या केलेल्या मराठा आंदोलकांना एक आठवड्यात आर्थिक मदत देणे यासंबंधीचा राज्यपालांची सही असलेला जीआर सहा वाजेपर्यंत शासनाकडून काढण्यात येणार आहे. जीआर हातात आल्यानंतर रात्री नऊ वाजता जरांगे पाटील मुंबई सोडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी राज्य सरकारने दहा मुद्दे असलेला जो प्रस्ताव जरांगे पाटील यांना दिला होता.
त्याचे जाहीर वाचन करून मराठा आरक्षणाच्या उपस्थित असलेल्या अभ्यासकांना जरांगे पाटील यांनी यावर काही आक्षेप आहे का? अशी विचारणा केली. यावर अभ्यासकांनी त्याला संमती दिली. त्यानंतरच जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. जीआर हातात येईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असून, त्यानंतरच विजयाचा गुलाल लावणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
तसेच शासनाने दिलेला शब्द जर पाळला नाही तर राज्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. या उपोषणामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असून, उपोषण सार्थकी लागल्याची भावना मराठा आंदोलक व्यक्त करत आहेत.









