संजय पाटील दुधगावकर आणि संजय निंबाळकर यांचा एकत्र राजीनामा चर्चेत
_
भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष
आरंभ मराठी / धाराशिव
राजकारण असो की समाजकारण गेल्या अनेक वर्षांपासून दोन संजयांची जोडी कायम एकत्र राहिली आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच एकमेकांना साथ देणारे संजय पाटील दुधगावकर आणि संजय निंबाळकर आजही प्रत्येक चढ-उतारात खांद्याला खांदा लावून उभे आहेत.त्यांनी प्रत्येक राजकीय आणि सामाजिक भूमिका एकत्र घेतल्या. 40 वर्षापासून मैत्रीभाव जपणारे हे मित्र पुन्हा एकदा चर्चेत असून,त्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
भाजपमधील कार्यकाळ असो, तेरणा साखर कारखाना निवडणूक असो की सत्तापालटाच्या प्रक्रियेतले क्षण, दोघेही नेहमीच एकत्र दिसले. कोणालाही अडचण आली तर जीवापलिकडे धावून जाणारे हे मित्र राजकारणातील मैत्रीचे प्रतिक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार पक्ष) जिल्हाध्यक्ष राहिलेल्या संजय पाटील दुधगावकर यांनी स्वखर्चाने आंदोलन उभी केली आणि शेतकऱ्यांसाठी कठोर भूमिका घेतल्या. पक्षाचे नेते संजय निंबाळकर यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली. अचानक उमेदवारी मिळाल्यानंतरही त्यांना मिळालेली मते उल्लेखनीय ठरली.
संजय पाटील दुधगावकर यांनी तत्त्वाशी तडजोड न करता स्वाभिमानाचे राजकारण केले. शेतकऱ्यांसाठी आंदोलन, आक्रमक भूमिका, आणि प्रत्यक्ष मदत, ही त्यांची ओळख ठरली. त्यांनी गरज पडल्यास स्वतःचा हरभरा व सोयाबीन विकून लोकांना मदत केली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवणारे, तरीही पाय जमिनीवर ठेवणारे दुधगावकर हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले.
माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहणे, पाटील कुटुंबीयांविरोधात ठाम भूमिका घेणे, या धैर्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. शेतकऱ्यांसाठी वैद्यकीय व शैक्षणिक मदतीचा हात पुढे करणारे हे नेते ग्रामीण भागातील गरजूंना आधार देत राहिले आहेत.
संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तर त्यांच्यासोबत संजय निंबाळकर यांनीही बुधवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
दोघांनी एकाचवेळी राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकारण, समाजकारण किंवा वैयक्तिक जीवन कोणताही प्रसंग असो, हे दोन्ही संजय नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. कालचा राजीनामाही त्याच मैत्रीची साक्ष देऊन गेला.
जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रस्थानी राहिलेल्या दोन संजयांच्या जोडीच्या पुढील निर्णयाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









