आरंभ मराठी / उमरगा
तोतया पोलीस बनून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेचे दीड लाख रुपये किंमतीचे सोने लुटल्याची घटना उमरगा शहरात घडली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, उमरगा शहरातील रहिवासी असलेल्या क्रांती भगवान कांबळे (वय 56 वर्षे) या दिनांक 25 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता उमरगा शहरातील मुंगळे हॉस्पिटल जवळून जात होत्या.
त्यावेळी त्यांना अज्ञात व्यक्तींनी हटकले. त्यांनी क्रांती कांबळे यांना ‘हम पोलीस वाले है, यहा पे एक औरतका खुन हुवा है, तुम इतना सोना नही पहेन सकते, आपके सुरक्षा के लीये हमे यहा ड्युटी दि गई है’ असे म्हणून पोलीसाचे डुप्लिकेट आयकार्ड दाखवले.
क्रांती कांबळे यांनाही ते पोलीस असल्याचा विश्वास बसल्यामुळे त्यांनी त्यांच्या गळ्यातील व हातातील 8.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने गंठण व पाटल्या काढून पर्समध्ये ठेवल्या. तोतया पोलिसांनी नकळत त्यांची दागिने ठेवलेली पर्स लंपास केली.
त्यांनी 1 लाख 43 हजार रुपयांचे सोने क्षणात लंपास केले. याप्रकरणी क्रांती कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 3(5)अन्वये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.