आरंभ मराठी / धाराशिवधाराशिव
शहरातील जिजाऊ चौक आऊट पोस्ट पोलिस चौकी मंजूर होऊनही कर्मचाऱ्यांअभावी सतत बंद असल्याबाबत दैनिक ‘आरंभ मराठी’ने वृत्त देऊन या प्रश्नावर आवाज उठवला होता.
पोलीस चौकी स्थापन होऊन चार महिन्यांचा कालावधी होत आला तरीदेखील या पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी बसत नाहीत. आरंभ मराठीने दिलेल्या याच वृत्तावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे.
कॉलेज आणि ट्युशन परिसर असलेला राजमाता जिजाऊ चौक सतत गजबजलेला असतो. त्यामुळे याठिकाणी मुलींच्या छेडछाडीचे तसेच तसेच किरकोळ कारणावरून हाणामारीचे गंभीर प्रकार घडतात.
त्यामुळे जिजाऊ चौक आऊट पोस्ट पोलिस चौकीबाबत अप्पर पोलीस महासंचालक यांनी पो म स/२६- अ/०१४३/०६/२०२४ दी २३/४/२०२४ रोजी आदेश पारित केले होते. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक यांनी तात्पुरती चौकी तयार केली आहे.
आनंदनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही पोलीस चौकी तयार करण्यात आली असून, याठिकाणी चार कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पोलीस चौकी तयार करून चार महिने झाले तरीही ही चौकी कर्मचाऱ्यांअभावी सतत बंद ठेवलेली असते. त्यानुषंगाने दैनिक आरंभ मराठीमध्ये सातत्याने हा प्रश्न मांडला आहे.
याच प्रश्नाला घेऊन भाजपचे आष्टी येथील आमदार सुरेश धस यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
आरंभ मराठीच्या वृत्ताचा दाखला देऊनही लक्षवेधी करण्यात आली असून, यावर गृह विभागाकडून काय उत्तर दिले जाते याकडे लक्ष लागले आहे.